महायुती सरकार आकंठ भ्रष्टाचारात बुडाले, समृद्धीसह सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढा; हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपा महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून कंत्राटदार, ठेकेदार यांच्या माध्यमातून केवळ कमीशन खाण्याचे उद्योग सुरु आहेत. समृद्धी महामार्गात २० हजार कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे व तोच पैसा राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापरला. या भ्रष्ट सरकारने त्यांच्या काळातील सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकराव चौधरी यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते जळगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. सपकाळ म्हणाले की, मुंबई व परिसरात सहा दिवसात मुसळधार पाऊस पडून मोठे नुकसान झाले आहे. स्कूल बसवर झाड पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. एक व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला असून इतर घटनांमध्ये १२ पेक्षा जास्त व्यक्तींचा जीव गेला आहे, जनजीवनही विस्कळीत झाले हे सर्व भाजपा महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे बळी आहेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, याचा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या एका विधानावर विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, नाशिकमध्ये ढगफुटी होणार, असे जाहीर करून शाळा, महाविद्यालयांना देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकारने सुट्टी जाहीर केली होती. पण ती केवळ अफवा होती. नाशिक व पंचक्रोशीत ढगफुटी तर झालीच नाही, फक्त काँग्रेसचे आंदोलन होऊ नये यासाठी त्यांनी अफवा पसरवली होती. आता ते माझे नाव न घेता मीच खोटा आहे, असे म्हणत असतील तर त्यांचे विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असेच म्हणावे लागले.

देवेंद्र फडणवीस हे धादांत खोटे बोलतात. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अजित पवार यांच्या पक्षाशी युती करणार नाही. सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देऊ, मराठा समाजाला फडणवीसच आरक्षण देऊ शकतो, अशा वल्गणा त्यांनी केल्या पण त्यातील काहीच केले नाही. लाडक्या बहिणांनाही २५०० रुपये देण्याची थाप त्यांनी मारली, त्यामुळे खोटे कोण बोलत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.