
केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सोमवारी रात्री शिंदे गटाच्या एका नगरसेवकासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिला डॉक्टर तसेच तीन महिला परिचारिकांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलीस्नी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पश्चिम येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर नवजात बाळाला जन्मानंतर एनआयसीयू उपचारांची आवश्यकता लागू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. मात्र रुग्णाल यातील एनआयसीयूचे सर्व दहा बेड भरले असल्याने संबंधित महिलेला पुढील उपचारांसाठी अन्य रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. याच कारणावरून नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाला. त्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात येऊन महिला डॉक्टर, आणखी एक डॉक्टर तसेच तीन महिला परिचारिकांना मारहाण केली. व्हायरल व्हिडीओमध्ये म्हात्रे मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. दरम्यान आंदोलनाच्या दणक्यानंतर रमेश म्हात्रे यांच्यासह पाचजणांवर विष्णूनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे.


























































