Ratnagiri News – मुसळधार पावसात आंजर्लेत आंब्याचे झाड घरावर कोसळले! सुदैवाने जीवितहानी टळली; सुमारे 60 हजार रुपयांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोपरी परिसरात आंब्याचे भलेमोठे झाड उन्मळून पडल्याने एका घराचे सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने घरमालक बाहेरगावी असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कोपरी भागातील शिंत्रे यांच्या घरासमोरील रस्त्यालगत उभे असलेले आंब्याचे मोठे झाड अचानक उन्मळून शिंत्रे यांच्या पडक्या वाड्यावर तसेच शेजारी असलेल्या रवी खंडकर यांच्या घरावर कोसळले. या दुर्घटनेत खंडकर यांच्या घराच्या छताचे आणि इतर भागांचे नुकसान झाले असून, सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रवी खंडकर हे नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असल्याने घरात कोणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अन्यथा या घटनेत जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती. घटनेची माहिती मिळताच आंजर्लेचे पोलिस पाटील जगदीश कळमकर, ग्रामपंचायत प्रशासक मेघना पवार, उदय बापट, मंगेश महाडीक, मकरंद म्हादलेकर, दत्ता जोशी, बाळ केळकर आणि दिगंबर निजसुरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच तलाठी पाटील यांना घटनेची माहिती देऊन पंचनामा व पुढील कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

मुसळधार पावसामुळे तालुक्यात झाडे उन्मळून पडण्याच्या घटना वाढत असून, धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.