
ठाणे शहराच्या खाडीकिनारी अमेझॉन हायपर-स्केल डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ११२ झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. यामध्ये आंबा, नारळ, चिंच, बदाम, फणस आणि प्राचीन अशा वडाच्या वृक्षांची बेसुमार कत्तल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या नावाखाली वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यासाठी परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाविरोधात पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
बाळकूम येथे प्रस्तावित असलेल्या अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पामुळे पाणीटंचाई, २४ तास ध्वनिप्रदूषण, तापमानात वाढ, पर्यावरणीय आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. परदेशातून हाकललेल्या या प्रकल्पाला ठाणे महापालिकेने पायघड्या घातल्या असून ६ हजार नागरिकांना त्रास होणार आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि पर्यावरणप्रेमींकडून विरोध करण्यात येत असताना येथे पार्किंग सेंटर, रस्ता, मुख्य प्रवेशद्वार आणि डेटा सेंटरची इमारत विकसित करण्यासाठी अमेझॉन डेटा सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पालिका प्रशासनाकडे वृक्ष तोडीची परवानगी मागितली होती. त्यानुसार पालिकेने २०२४ मध्येच ही परवानगी दिली असल्याची धक्कादायक बाब आता उघडकीस आली आहे.
या झाडांचा समावेश
डेटा सेंटरच्या कामामध्ये बाधित होणाऱ्या ३१६ वृक्षांपैकी २०४ वृक्षांमध्ये अरेका पाम २, चिकू १, कॉर्डर्डिया ६, फायकस २, ग्लिरीसीडीया १, मोह १, पांगारा १, शिसम २, असुपालव ५४, उंबर १२, ऑस्ट्रेलियन बाभूळ ५, शेवगा २, निम २, देशी बदाम १२, वड ९, सोनमोहर १२, जांभूळ १३, वावळा १, रॅन्ट्री ८, गुलमोहर ३५, काटेसावर ०१, धामन ०२, बोर ०१, कनकचंपा ०१, चारकोल ट्री ६, खारोटी ०३, फणस ०२, पिंपळ ०७ ही झाडे तांत्रिकदृष्ट्या पुनर्रोपण शक्य असल्याने पुनर्रोपण करण्याची अट वृक्षप्राधिकरण विभागाने घातली होती. दरम्यान कत्तल करण्यात आलेल्या ११२ वृक्षांमध्ये आंबा ३९, नारळ ४, रॉयल पाम ८, चिंच ८, सुबाभूळ २२, मृत वृक्ष २७, १ देशी बदाम, १ फणस, १ चारकोल ट्री आणि १ वडाच्या झाडाचे पुनर्रोपण अशक्य असल्याने ती तोडण्यात आली आहेत.
खासदारांना उशिरा जाग
प्रकल्पामुळे वाहतूककोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण, पाणी व वीज वापरावर अतिरिक्त ताण येणार आहे. गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींचा या प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. त्यामुळे या प्रकल्पास तात्काळ स्थगिती देण्यात यावी तसेच प्रकल्पाच्या ठिकाणी बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्याने संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मात्र ही मागणी म्हणजे खासदारांना उशिरा आलेली जाग आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.





























































