Share Market News – इराणसोबतची शस्त्रसंधी संपली! डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने शेअर बाजार गडगडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपल्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स १६०० अंकांनी तर निफ्टी 500 अंकांनी घसरला आहे. इराणने तीन जहाजांवर केलेल्या हल्ल्यानंतर ट्रम्प संतप्त झाले असून त्यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपल्याचे जाहीर केले. यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. दुपारी २ वाजेपर्यंत, निफ्टी १.८४ टक्क्यांनी, म्हणजेच ४३४ अंकांनी घसरून २३,९७१ वर आला. सेन्सेक्स १.८४ टक्क्यांनी, म्हणजेच १५०० अंकांनी घसरून ७६,७४० वर आला. तर बँक निफ्टीमध्ये 1400 अंकांची घसरण झाली आहे.

शेअर बाजारात दुपारी अचानक मोठी घसरण झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी संपल्याचे जाहीर केले. सकाळी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीने सुरू झाला. दुपारपर्यंत बाजार दबावाखाली होता. बँकिंग शेअर्समधील घसरणीमुळे बँक निफ्टीमध्येही घसरण झाली. मात्र, दुपारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी संपल्याच्या घोषणेमुळे बाजाराचे प्रमुख निर्देशांक कोसळले. सेन्सेक्स १,६०० अंकांनी घसरला.

ट्रम्प म्हणाले की, इराणसोबतची शस्त्रसंधी संपली आहे. त्याचा परिणाम शेअर बाजारावर लगेचच दिसून आला आणि दबावाखाली असलेला शेअर बाजार अचानक मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किमतींवरही त्याचा परिणाम जाणवला. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ७८ डॉलरच्या वर गेली आहे.

मोठ्या आणि लहान दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. सर्वाधिक नुकसान झालेल्या कंपन्यांमध्ये जिओ फायनान्शियल, श्रीराम फायनान्स, इंटरग्लोब एव्हिएशन, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी असेट मॅनेजमेंट आणि मारुती सुझुकी यांचा समावेश होता. या शेअर्समध्ये ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली.