मुख्यमंत्रीपदासाठी मिंधे कोणतीही किंमत मोजायला तयार, हा भस्मासूर फडणवीस-शहांच्या मानेवरही बसल्याशिवाय राहणार नाही! – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकनाथ शिंदे हे आज देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत आहेत. त्यांची भूक वाढली असून ते भविष्यात नरेंद्र मोदी, अमित शहांनाही आव्हान देतील. पूर्वी असे म्हणायचे की, पैशांचा विषय हा खोक्यांमध्ये व्हायचा, आता शिंदेंकडे कंटेनर आणि गोडाऊनमध्ये होतो. या आर्थिक ताकदीची फडणवीस आणि भविष्यात अमित शहा पुरे पडणार नाहीत. हा भस्मासूर फडणवीस-शहांच्या मानेवरही बसल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील इतर भाग लुटून जी संपत्ती गोळा केली जात आहे ती राजकारणामध्ये आणली जात आहे. कोणतीही किंमत मोजून शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी ते दिल्लीली कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत. त्यातील 50 टक्के रक्कम त्यांनी मोजली आहे. सांगाल ती किंमत मोजायला शिंदे तयार असून त्यांना मुख्यमंत्रीपद हवे आहे. या आर्थिक ताकदीपुढे देवेंद्र फडणवीस हतबल झालेले दिसत आहे. हा भस्मासूर भाजपने निर्माण केलेला असून तो फडणवीस आणि शहांच्या मानेवर बसल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राजकीय अफवा पसरवणे हा भाजपच्या कार्यशैलीचा भाग आहे. या क्षणी महाराष्ट्रात आमचे सहा खासदार निघून गेलेले आहेत. ते गद्दार असून पैशाच्या ताकदीवरती मिंधे गटाने फोडलेले आहेत. आमदार फुटणार… आमदार फुटणार… अशा बातम्या रोज येत आहेत. काल सर्व आमदार ‘मातोश्री’वर उपस्थित होते.

‘मातोश्री’वरील आमदारांच्या बैठकीत काय झालं? संजय राऊत यांनी दिली संपूर्ण माहिती

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्ष एनडीएमध्ये विलीन होईल का? तर ही गोष्ट मला पूर्णपणे अशक्य वाटते. आता पक्षामध्ये काही लोक वेगळ्या भूमिकेचे असतात. त्यांच्याविषयी बोलू शकत नाही. पण राजकीय भविष्य हे यापुढे भाजपचे राहिलेले नसून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि केंद्रीय स्तरावर इंडिया आघाडी यांचे राजकीय भविष्य उत्तम दिसत आहे. त्याच्यामुळे जर कुणी असा अविचार करत असेल तर ते राजकीय आत्महत्या करतील हे माझे स्पष्ट मत आहे, असेही संजय राऊत म्हणाले.