
मुंबईतील भांडुपमध्ये बुधवारी सकाळी एक दुर्दैवी अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. कोकणनगर परिसरातील क्रिटिकल रुग्णालय परिसरात एका बेस्ट बसने काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरील अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक व्यक्ती जखमी झाला असून वाहनांचेही नुकसान झाले आहे. तसेच जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार,सकाळी 8.30 च्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे. ही अपघातग्रस्त बस ही ई-बस असल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट बस मागे (रिव्हर्स) घेत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्य़ाने हा अपघात घडला. यादरम्यान बसने तीन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक दिली. यामध्ये एक अतुल पाडळे हा व्यक्ती जखमी झाला आहे.
मुंबईतील भांडुपमध्ये बुधवारी सकाळी अनियंत्रित बेस्ट बसची पादचाऱ्यांसह अनेक वाहनांना धडक, अपघातात एक जण जखमी झाल्याची माहिती. pic.twitter.com/4C9XcPZqMG
— Saamana Online (@SaamanaOnline) July 8, 2026
अपघात घडताच घटनास्थळावरील नागरिकांच्या मदतीने जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी जवळच्या एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, या घटनेबाबत पोलीस आणि बेस्ट प्रशासनाकडून पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.






























































