
ज्येष्ठ नागरिकांना प्रवास सवलतीसाठी आवश्यक असलेले एसटीचे स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी कल्याण बस आगारात अक्षरशः हेलपाटे मारावे लागत आहेत. प्रशासनाच्या भोंगल कारभाराचा फटका वृद्धांना बसत आहे. पावसात तासनतास रांगेत उभे राहूनही कार्ड मिळत नसल्याने कल्याण एसटी डेपोच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
कल्याण स्टेशन परिसरातील ‘सॅटीस’ आणि परिसर विकास प्रकल्पामुळे कल्याण बस आगाराच्या नूतनीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे कल्याण आगार विठ्ठलवाडीत हलवण्यात आले आहे. मात्र कल्याण डेपोत स्मार्ट कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी तात्पुरते पत्र्याचे शेड उभारले आहे. या शेडमध्ये ना पुरेशी जागा, ना बसण्याची व्यवस्था, ना पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. एवढेच नव्हे तर शेडलगत असलेल्या मुतारीमधून येणाऱ्या उग्र दुर्गंधीमुळे ज्येष्ठ नागरिकांना तेथे थांबणेही कठीण झाले आहे.
स्मार्ट कार्डसाठी दररोज शेकडो ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे राहत असताना संपूर्ण कामकाजासाठी केवळ दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रिया आणि कार्ड वितरणाचा वेग अत्यंत संथ आहे. अनेकांना तीन ते चार वेळा डेपोत फेऱ्या माराव्या लागत आहेत. मुसळधार पावसात रांगेत ज्येष्ठांना उभे राहावे लागत असूनही प्रशासनाने कोणतीच पर्यायी व्यवस्था केलेली नसल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक आनंद क्षीरसागर आणि राजरतन भालेराव यांनी नाराजी व्यक्त केली.






























































