कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्करोगाच्या लवकर निदानासाठी उपचार पॅकेजमध्ये ‘पेट स्कॅन’चा समावेश करण्यात येणार असून यामुळे रुग्णांचे निदान अधिक लवकर होऊन वेळेत उपचार सुरू करण्यास मदत होईल. तसेच फॉलो-अप पॅकेजेस आणि निदान प्रक्रियाही अधिक सुलभ व प्रभावी करण्यासाठी सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली. कर्करोग, न्यूरो आणि ऑर्थो उपचारांसाठी सर्वसमावेशक पॅकेजेस तयार करण्यात येणार असून अतिरिक्त खर्च करावा लागू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अपूर्ण उपचारामुळे रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यालाही प्राधान्य देणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

मनमानी उपचार शुल्कांनाही चाप

रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱया मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, बॉम्बे नार्ंसग ऍक्ट, महाराष्ट्र नार्ंसग ऍक्ट आणि क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्टमध्ये आवश्यक स्पष्टता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे भविष्यात ‘राईट टू पेशंट’ आणि ‘राईट टू हॉस्पिटल’ या संकल्पनांना बळ मिळून नागरिकांना दर्जेदार आणि माफक दरात उपचार उपलब्ध होतील, तसेच रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही, असे आश्वासनही आबिटकर यांनी यावेळी दिले.