हालांद की हॅरी… कोणाची निघणार विजयी स्वारी, नॉर्वे आणि इंग्लंडमध्ये तिसरी उपांत्यपूर्व फेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्लिंग हालांदने केवळ ब्राझीलचा पराभवच केला नाही, तर त्यांना पूर्णपणे नामोहरम केले. अखेरच्या 11 मिनिटांत त्याने दोन गोल केले आणि विजयाचा नायक ठरला. दुसरीकडे आहे तो इंग्लंडचा हॅरी केन. आपल्या चपळ हालचालींनी सामन्याची नूर बदलण्याची ताकद त्याच्या पायांमध्ये आहे. त्यामुळे नॉर्वे आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यात हालांद आणि हॅरी यांच्यामध्ये कोणता खेळाडू आपले वर्चस्व दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

1998 नंतर कधीही विश्वचषकात न खेळलेला नॉर्वेचा संघ स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. हालांदने पाच सामन्यांत सात गोल केले आहेत आणि ‘गोल्डन बूट’साठी किलियन एम्बाप्पे आणि लिओनेल मेस्सी यांच्याशी त्याची चुरस सुरू आहे. मियामीमध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांचा सामना होणार आहे. इंग्लंडने गेल्या सामन्यात 3-2 असा विजय मिळवला होता. हॅरी केनचा या सामन्यातील गोल सर्वांच्या लक्षात राहणारा होता. कठीण परिस्थितीमधून त्याने संघाला बाहेर काढले आहे.

इंग्लंडची संघ रचना…

इंग्लंडच्या संघाची रचना प्रामुख्याने क्वानसाहच्या निलंबनामुळे निश्चित झाली आहे. जॉर्डन हेंडरसनला आनंद साजरा करताना मनगटाची दुखापत झाली आणि तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. डेक्लान राईस अलीकडच्या काळात आजारी होता, पण तो खेळण्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नॉर्वे विरुद्ध इंग्लंड

शनिवारच्या सामन्यापूर्वी नॉर्वे आणि इंग्लंड कधीही विश्वचषकात आमने सामने आलेले नाहीत. त्यांच्यातील सर्वात महत्त्वपूर्ण स्पर्धात्मक इतिहास पात्रता फेरीतील आहे. 1993 मध्ये उलेवाल येथे झालेल्या एका प्रसिद्ध सामन्यात नॉर्वेने इंग्लंडचा 2-0 असा पराभव केला होता. त्या सामन्याव्यतिरिक्त दोन्ही देशांमधील बहुतांश मैत्रीपूर्ण सामने इंग्लंडने जिंकले आहेत.

नॉर्वेची संघ रचना…

प्रशिक्षक स्टेल सोलबक्केन यांच्यामते ब्राझीलला पराभूत करणाऱ्या संघात बदल करण्याचे कोणतेही कारण नाही. ज्युलियन रायरसन, क्रिस्टोफर अजर, टॉर्बजॉर्न हेगेम आणि डेव्हिड मोलर वोल्फ या चौघांच्या बचाव फळीमागे ओरजान नायलँड गोलरक्षक म्हणून असेल. पॅट्रिक बर्ग आणि सँडर बर्गे मिडफिल्ड सांभाळतील, तर त्यांच्या पुढे मार्टिन ओडेगार्ड खेळेल, तसेच अलेक्झांडर सोर्लोथ, हालांद आणि अँटोनियो नुसा हे आक्रमक फळीतील तिघे असतील.

नॉर्वेचा संभाव्य संघ   (4-3-3) : ओरजान नायलँड (गोलरक्षक) ; ज्युलियन रायरसन, क्रिस्टोफर अजर, टॉर्बजॉर्न हेगेम, डेव्हिड मोलर वोल्फ (बचावपटू); पॅट्रिक बर्ग, सँडर बर्ग, मार्टिन ओडेगार्ड (मिडफिल्डर); अँटोनियो नुसा, आर्ंलग हालांद, अलेक्झांडर सोर्लोथ (आक्रमणपटू).

इंग्लंडचा संभाव्य संघ (4-2-3-1) : जॉर्डन पिकफर्ड (गोलरक्षक); जेड स्पेंस, एज्री कोन्सा, जॉन स्टोन्स, निको ओ’रायली(बचावपटू); इलियट अॅण्डरसन, डेक्लान राईस, बुकायो साका, ज्यूड बेलिंगहॅम, अँथनी गॉर्डन (मिडफिल्डर); हॅरी केन (आक्रमणपटू).