
अमेरिका-इराण युद्धादरम्यान दुबईवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तेथील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. दुबईतील पर्यटन व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारने नवीन योजना आणल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी दुबई जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक मानले जात होते. २०२५ मध्ये, अंदाजे १.९६ कोटी परदेशी पर्यटकांनी या देशाला भेट दिली, जो एक विक्रम आहे. मात्र, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आखाती देशात वाढलेल्या तणावाचा परिणाम दुबईच्या पर्यटनावरही झाला.
पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दुबई सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) राहणारे लोक त्यांच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना दुबईला भेट देण्यासाठी आमंत्रित केल्यास ७५,००० रुपयांपर्यंत (३,००० दिरहॅम) बक्षीस मिळवू शकतात.
दुबई सरकारने अलीकडेच ‘दुबई इन्व्हाइट’ नावाची ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, वैध एमिरेट्स आयडी असलेला १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा कोणताही UAE रहिवासी दुबईला भेट देण्यासाठी तीन नातेवाईक किंवा मित्रांना नामनिर्देशित करू शकतो.
आमंत्रित पाहुणे ३१ ऑक्टोबरपर्यंत दुबईमध्ये आले, तर त्यांना हॉटेलमधील निवास, भोजन आणि इतर प्रवास सवलतींचा लाभ मिळू शकतो. त्या बदल्यात, आमंत्रित करणाऱ्याला ३,००० दिरहॅम किंवा अंदाजे ७५,००० रुपयांपर्यंतचे बक्षीस पॅकेज देखील मिळू शकते. वैध व्हिसासह हवाई, सागरी किंवा रस्त्याने दुबईत येतात, त्या पर्यटकांसाठीच ही योजना आहे.
या वर्षी, आखाती देशातील वाढत्या तणावाचा परिणाम दुबईवरही झाला. इराणने दुबईवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. बहुतेक क्षेपणास्त्रे रोखण्यात आली असली तरी, काहींमुळे शहरातील प्रमुख भागांचे आणि इमारतींचे नुकसान झाले. यामुळे अनेक पर्यटकांनी त्यांच्या सहली पुढे ढकलल्या आहेत. अहवालानुसार, पूर्वी हॉटेलमधील खोल्यांची उपलब्धता (ऑक्युपन्सी) सरासरी ८०% असायची, परंतु आता येत्या काही महिन्यांत हा आकडा सुमारे १०% पर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
दुबई सरकारने पर्यटकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी आधीच अनेक पावले उचलली आहेत. आलिशान हॉटेल्सवरील रात्रीचा कर (नाईट टॅक्स) तात्पुरता हटवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, पर्यटकांचा खर्च कमी करण्यासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या बिलांवरील ७% महानगरपालिका शुल्क देखील माफ करण्यात आले आहे.
क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान, दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ थोड्या काळासाठी बंद करण्यात आले होते. ब्रिटिश एअरवेज आणि एमिरेट्ससह अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे तात्पुरती स्थगित केली होती. विमानतळ, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि पर्यटन स्थळे आता सामान्यपणे कार्यरत असली तरी, लोकांमध्ये असलेली भीती हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे मानले जाते. लोकांचा आणि पर्यटकांचा विश्वास पुन्हा मिळवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.




























































