
शिंदे गटाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकली असा दावा करत शिवसेनेने त्यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान दिले असून, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेले ईव्हीएम मशीन मुक्त करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज केला आहे. मात्र, या अर्जाला शिवसेनेच्या वतीने आज जोरदार आक्षेप घेण्यात आला. ईव्हीएम मुक्त करण्यामागे कोणतीही अत्यावश्यक किंवा अपरिहार्य गरज असल्याचे कोणतेही ठोस पुरावे आयोगाने कोर्टात सादर केलेले नाहीत. त्यामुळे सुरक्षित असलेले ईव्हीएम मुक्त करण्याची घाई नको, असा युक्तिवाद शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. कुर्ला मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवार प्रवीणा मोरजकर यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली.





























































