
मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या काही महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी अवाजवी शुल्क आकारले जात आहे. महाविद्यालयाकडून कॅपिटेशन फीच्या नावाखाली हे शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करत युवासेनेने शुल्क नियामक प्राधिकरण विभागावर धडक दिली. अवाजवी शुल्क वसुली थांबवा व महाविद्यालयांना नियमित शुल्क घेण्याचे आदेश द्या, अशी मागणी युवासेनेने केली आहे.
प्रशासनाकडून 2025-26 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी महाविद्यालयांना दुप्पट शुल्क आकारण्याची परवानगी दिली होती. कायद्यानुसार कॅपिटेशन फी घेण्यास बंदी असतानाही महाविद्यालये परवानगीचा गैरफायदा घेत दुसऱ्या वर्षातही विद्यार्थ्यांकडून दुप्पट शुल्क वसूल करत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे.
विद्यार्थी व पालकांकडून या संदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. याची दखल घेऊन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी शुल्क नियामक प्राधिकरणाचे सदस्य सचिव समीर कुर्तकोटी यांची भेट घेतली. प्राधिकरणाने मागील वर्षी जारी केलेला हा निर्णय तातडीने रद्द करावा आणि नियमित शुल्क घेण्याचे स्पष्ट आदेश महाविद्यालयांना द्यावेत, अशी मागणी युवासेनेने निवेदनाद्वारे केली आहे. नवनियुक्त अध्यक्ष शेखर चन्ने यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर तातडीने निर्णय घेण्यात येतील असे आश्वासन प्राधिकरणाकडून देण्यात आले.
वडाळा येथील विद्यालंकार इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाने मॅनेजमेंट कोटय़ातून प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांकडून एक लाख 80 हजार नियमित शुल्कासह साडेतीन ते चार लाख रुपये घेतले होते. त्यानंतर दरवर्षी साडेतीन लाखांहून अधिक शुल्क कॅपिटेशन फीच्या नावाने घेतले जाणार असल्याचे युवासेनेने स्पष्ट केले.

























































