आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी सीआरपीएफकडून कोअर ग्रुपची स्थापना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निमलष्करी दलातील वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी सीआरपीएफने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेला 10 सदस्यांचा ‘कोअर ग्रुप’ स्थापन केला आहे. या गटाचे नेतृत्व सीआरपीएफचे महासंचालक करतील. अशा घटनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी हा गट महिन्यातून एकदा बैठक घेईल.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल म्हणजेच सीआरपीएफमध्ये 2025 मध्ये आत्महत्येच्या 59 घटनांची नोंद झाली, जी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक संख्या आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 80 टक्क्यांहून अधिक कर्मचारी हे कॉन्स्टेबल श्रेणीतील होते. या पार्श्वभूमीवर, आपल्या जवानांमधील स्वतःला इजा करून घेण्याच्या किंवा आत्महत्येच्या घटना रोखण्यासाठी सीआरपीएफने हा ग्रुप स्थापन केला आहे.

2021-2025 या कालावधीतील आकडेवारीनुसार, एकूण 262 प्रकरणांपैकी 77 टक्क्यांहून अधिक मृत्यू हे कर्मचारी कर्तव्यावर असताना झाले, तर उर्वरित मृत्यू ते रजेवर असताना झाले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घटनांची दखल घेत, 14 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहसचिव आणि सीआरपीएफच्या महासंचालकांना नोटीस बजावली. या प्रकरणावर दोन आठवड्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश या नोटीशीत देण्यात आले आहेत.

नव्याने स्थापन झालेला हा कोअर ग्रुप आत्महत्येच्या प्रत्येक प्रकरणाची तपासणी करेल. तसेच, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक, कल्याणकारी, प्रशासकीय आणि वैद्यकीय उपाययोजना सुचवेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.