Ratnagiri News – चिपळूणच्या महाराजाचे जल्लोषात स्वागत! महिलांची मनोरा रचून आगळीवेगळी सलामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहरातील मानाचा समजला जाणाऱ्या ‘चिपळूणचा महाराजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य गणेशमूर्तीचे शनिवारी आगमन मिरवणुकीद्वारे जल्लोषात स्वागत करण्यात आले. पारंपरिक वाद्यांसह संबळ वाद्यांनी यावेळी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. डीजेच्या तालावर तरुणाईने उत्साहात ठेका धरत मिरवणुकीचा आनंद लुटला.

चिपळूणच्या महाराजाची मूर्ती शहरातील वडनाका येथील एकविरा मंदिराशेजारी स्थापित करण्यात येते. आगमन मिरवणुकीची सुरुवात मार्कंडी येथील श्री साई मंदिरापासून करण्यात आली. त्यानंतर वेस मारुती मंदिर, चिंचनाका मार्गे वडनाकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये चिपळूणचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते नव्या टी-शर्टसह अनोख्या लूकमध्ये सहभागी झाले होते. शहरासह परिसरातील कार्यकर्ते आणि भाविकांनीही मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग घेतला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, नगरसेवक निहार कोवळे, मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंड्याशेठ पेडणेकर, बंधू कदम, आकाश कदम, बाळा गुरव, तुषार गुरव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.