
समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवर अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिल्यानंतर कार डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे 5.10 च्या सुमारास डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चैनल क्रमांक 263 येथे हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅंडी व्हाईट रंगाची स्कोडा कार नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान, कारने पुढे जात असलेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर कार रस्त्याच्या बाजूच्या डिव्हायडरवर जाऊन आदळल्याने अपघात झाला. या अपघातात कार चालक हिरेन रमेशभाई सिद्धपुरी (रा. राजकोट, गुजरात) यांचा मृत्यू झाला. तर तुषार मकवाना आणि वीरेन सिद्धपुरी हे गंभीर जखमी झाले. जखमींना समृद्धी महामार्गावरील ॲम्बुलन्सच्या मदतीने तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग उपकेंद्रातील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त कार रस्त्याच्या बाजूला करण्यात आली असून, घटनास्थळी बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

























































