
आगामी वनडे World Cup 2027 च्या पार्श्वभुमीवर सर्व संघांनी आपापली विस्कटलेली फळी सुरळीत करण्यास सुरुवात केली आहे. इंग्लंड संघाने सुद्धा त्यादृष्टीने पाऊल टाकत माजी विस्फोटक खेळाडू केविन पिटरसनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे तब्बल 12 वर्षांनी केविन पीटरसन इंग्लंडच्या जर्सीत पाहायला मिळणार आहे. पण यावेळी त्याजी भूमिका वेगळी असून तो मैदानात नाही तर मैदानाच्या बाहेरून सुत्र हलवताना दिसेल.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) आगामी 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीसाठी केविन पीटरसनची इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या (व्हाईट-बॉल) संघाचा विशेष मेंटोर म्हणून नियुक्ती केली आहे. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वर्ल्ड कपच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला असून, पीटरसन श्रीलंका दौऱ्यावरील आगामी तीन टी-20 आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतून आपल्या नव्या भूमिकेची सुरुवात करतील. मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅकुलमच्या सपोर्ट स्टाफचा भाग बनणाऱ्या पीटरसनला दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीचा आणि तेथील खेळपट्ट्यांचा दांडगा अनुभव आहे. तो मार्कस ट्रेस्कोथिक, टिम साउदी आणि जीतन पटेल यांसारख्या दिग्गजांसोबत मिळून इंग्लंड संघासाठी रणनीती आखणार आहे, ज्याचा फायदा विशेषतः युवा फलंदाजांना होईल. संघाला वर्ल्ड कप जिंकवून देण्यासाठी आपण पूर्ण जोमाने काम करू, अशी भावना पीटरसनने व्यक्त केली आहे.

























































