
नालासोपारा परिसरातील सोपारा जिल्हा परिषद शाळेत मंगळवारी दुपारच्या सुमारास कुकरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत दोन शाळकरी विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवणारी महिलाही भाजली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आयुष चौधरी आणि प्रसाद गौतम अशी जखमी विद्यार्थ्यांची नावे असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास शाळेच्या परिसरात जेवण बनवत असताना कुकरचा स्फोट झाला. यावेळी जवळ असलेले दोन विद्यार्थी जखमी झाले. आयुष चौधरी हा इयत्ता तिसरीत, तर प्रसाद गौतम हा इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. कुकरचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.



























































