गणेशभक्तांना दिलासा! गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोकणवासीयांच्या जिव्ह्याळ्याच गणेशोत्सव सण अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आला आहे. 11 सप्टेंबर 2026 ते 27 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-48), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (राम-66), सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील कोकणात जाणारे रस्ते व नगर विकास विभागाच्या अखत्यारितील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूमार्ग या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सवलत देण्यात आली आहे.

याकरिता “गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन” अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पासेस त्यावर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद करुन ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेसमध्ये उपलब्ध होतील. तसेच सदरचे पास परतीच्या प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येतील.

गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बसेस महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यातून येणार आहेत. तेथील पोलीस विभाग किंवा प्रादेशिक परिवहन विभाग यांचेकडे वरील “गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन” प्रमाणे पासेस उपलब्ध करुन देण्यात येतील. संबंधित जिल्ह्यातून गौरी-गणपती वाहतुकीसाठी रवाना होणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकर माफी असलेले पासेस लावून/चिकटवून सदरच्या बसेस रवाना होतील.