
अंधाराचा फायदा घेत नशेबाजांसाठी अनरेक्स कफ सिरपच्या बाटल्या विकण्यासाठी घेऊन आलेल्या एका ड्रग तस्कराला देवनार पोलिसांनी उचलले. त्या तस्कराकडील गोणीत कफ सिरपच्या 50 बाटल्या मिळून आल्या. देवनार पोलिसांचे पथक रविवारी रात्री हद्दीत गस्त घालत असताना आयओसी जंक्शनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाजवळ एक संशयित व्यक्ती पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागली. त्यामुळे पथकाने पाठलाग करून त्या व्यक्तीला पकडले. त्या संशयिताकडील गोणीची तपासणी केली असता 50 अनरेक्स कफ सिरपच्या बाटल्या मिळून आल्या. या बाटल्या तो कोणाला विकणार होता आणि कोणाकडून आणल्या याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

























































