हिमाचल प्रदेश – कुल्लूत भीषण अपघात, कार दरीत कोसळून चार जणांचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्याच्या आनी उपविभागातून भीषण रस्ते अपघाताची बातमी समोर आली आहे. सोमवारी रात्री उशिरा सुमारे साडेतीन वाजता, राष्ट्रीय महामार्ग 305 वरील हरिपूरजवळ एक अल्टो कार अनियंत्रित होऊन रस्त्याखाली सुमारे 350 मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. कारमधील सर्व पाचही जण एकाच गावचे रहिवासी आणि नातेवाईक होते, जे एका लग्न समारंभातून आपल्या घरी परतत होते.

पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व तरुण एका नातेवाईकाच्या घरी लग्न समारंभासाठी गेले होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा आपल्या गावी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. मंगळवारी सकाळी स्थानिकांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि प्रशासकीय पथकांना याबाबत कळवले. माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी दरीत उतरून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. अपघातस्थळावरून चारही जणांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

कुल्लूचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात प्राण गमावलेल्या चार तरुणांची ओळख राहुल राणा, बाळकृष्ण, विकास ऊर्फ विकी आणि गुंजन अशी पटली आहे. हे चौघेही आनी तहसीलच्या जबोधा गावचेच रहिवासी होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेला 29 वर्षीय सुरेश कुमार हादेखील त्याच गावातील असून, त्याला आनी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार दिल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी रामपूर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे.