मुस्लीम तरुणांनो, गरब्याला येताना स्वतःच्या बहिणींनाही सोबत आणा, आमची मुलंही तयार आहेत, भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवरात्रोत्सवातील गरबा कार्यक्रमांमध्ये मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरून मध्य प्रदेशातील भाजप आमदार रामेश्वर शर्मा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. “मुस्लिम तरुणांनी गरब्याला एकट्याने न येता आपल्या बहिणी आणि मुलींनाही सोबत घेऊन यावे, आमची मुलेही तयार आहेत,” असे वक्तव्य शर्मा यांनी केले. या वक्तव्यावरून काँग्रेस आणि एआयएमआयएम (AIMIM) पक्षाने भाजप आमदारावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भोपाळमधील हुजूर मतदारसंघाचे भाजप आमदार रामेश्वर शर्मा एका जाहीर कार्यक्रमात बोलताना म्हणाले, “मुस्लिम मुलांना गरब्यात एकट्यानेच का यायचे असते? त्यांनी एकट्याने न येता आपल्या बहिणींना आणि मुलींनाही सोबत घेऊन यावे. आमची मुलेही तयार आहेत.”

पुढे बोलताना शर्मा म्हणाले, “मुस्लिमांना जर कायमस्वरूपी आमच्यात सामील व्हायचे असेल, तर त्यासाठीही आमची तयारी आहे. या, कपाळावर टिळा लावा आणि ‘जय श्री राम’चा नारा द्या, मग कुणालाच काही अडचण नसेल.” याशिवाय गरब्यात ‘लव्ह जिहाद’ तसेच इतर गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देत ते म्हणाले, “तरुणांनी आई-वडिलांची सेवा करावी आणि बहिणींचे रक्षण करावे. जगदंबेचा आशीर्वाद घेऊन अशा ‘राक्षसां’चा नायनाट करण्यासाठीही तरुणांनी सज्ज राहावे.”