डीजे आवाजामुळे 7 वर्षांच्या विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका, शाळेतच मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. वैष्णवी असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. शहरातील कोतवाली भागातील डिव्हाईन पब्लिक स्कूलमध्ये ही घटना घडली. शाळेबाहेरील चौकात मोठ्या आवाजात वाजणारा डीजे वैष्णवीच्या मृत्यूला कारण असल्याचे मानले जात आहे. या घटनेचे थरारक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील सिटी पॅलेस परिसरातील डिव्हाईन पब्लिक स्कूलजवळ सकाळी 11.25 च्या सुमारास गणेश विसर्जन सुरू होते. यावेळी मोठ्या आवाजात डीजे वाजत होता. या आवाजामुळे वैष्णवीला अस्वस्थ वाटू लागले आणि ती बेशुद्ध पडली. तिने तीन वेळा बाकावरून उठण्याचा प्रयत्न केला, मात्र ती उठू शकली नाही. शिक्षकांनी तात्काळ तिला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शाळा दुपारी 12 वाजता सुटणार होती. मात्र, शाळा सुटण्याआधीच हा दुर्दैवी अपघात घडला, असे डिव्हाईन पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक आशिष उपाध्याय यांनी सांगितले. डीजेच्या आवाजामुळे विद्यार्थिनीच्या झालेल्या मृत्यूच्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे, असे शहर क्षेत्र अधिकारी अभिषेक सिंह यांनी सांगितले. सध्या, कुटुंबीयांकडून कोणतीही लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पोलीस या घटनेच्या सर्व पैलूंचा तपास करत असून, तक्रार प्राप्त झाल्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.