तामिळनाडूत 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार फ्री ब्रेकफास्ट, मुख्यमंत्री विजय यांनी लॉन्च केली योजना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी एम. के. स्टॅलिन सरकारच्या सर्वात लोकप्रिय कल्याणकारी योजनांपैकी एक असलेल्या ‘मुख्यमंत्र्यांची नाश्ता योजना’ कायम राखत तिचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विजय सरकारने या योजनेचे नाव बदलून काँग्रेसचे महान नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांच्या नावावरून ‘पेरुंथलायवर कामराज नाश्ता योजना’ असे ठेवले आहे.तसेच या योजनेंतर्गत आता आठवी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत नाश्ता दिला जाणार.

शालेय शिक्षणाचा विस्तार आणि मध्यान्ह भोजन योजनेचे श्रेय माजी मुख्यमंत्री के. कामराज यांना जाते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठीच हे नाव बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडेच मुख्यमंत्री विजय यांनी एका शाळेला अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसून नाश्ता केला होता, ज्याचे फोटोही समोर आले होते.

ही योजना एम. के. स्टॅलिन यांच्या सरकारने 2022 मध्ये प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरू केली होती. आता विजय सरकार या योजनेचा विस्तार करत 15,454 सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील आणखी 15.30 लाख विद्यार्थ्यांना यात सामावून घेत आहे. या प्रकल्पासाठी सरकारने अतिरिक्त 217.63 कोटी रुपयांची तरतूद केली असून, एकूण शासकीय खर्च 724 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या योजनेअंतर्गत आता आठवी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत नाश्ता दिला जातो. विजय सरकार मागील द्रमुक सरकारच्या कल्याणकारी योजना रद्द न करता त्या पुढे नेत आहेत.

दुसरीकडे, डीएमकेने सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. डीएमकेचे प्रवक्ते टी. के. एस. एलंगोवन यांनी टीका करताना म्हटले की, आम्ही सुरू केलेल्या कार्यक्रमांची नावे बदलणे हेच त्यांचे एकमेव काम असून ते स्वतः नवीन काहीही करत नाहीत. या टीकेला उत्तर देताना तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अमेरिका नारायणन यांनी कामराज यांनीच या कार्याची पायाभरणी केली होती असे सांगत हा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचे म्हटले आहे.