
अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता जागतिक पातळीवर गंभीरपणे उमटू लागले आहेत. या दोन्ही देशांमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून असणाऱ्या देशांमध्ये त्यामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाईचा मोठा ताण निर्माण झाला आहे. जगाच्या एकूण तेलाच्या गरजेपैकी तब्बल 20 टक्के पुरवठा करणाऱ्या होर्मूझच्या सामुद्रधुनीतील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जेचे संकट अधिक गडद झाले आहे. पण अमेरिकेने इराणची एक अट मान्य केल्यास सात दिवसांत होर्मूझची सामुद्रधुनी खुली होऊ शकते आणि होर्मुजचा तणाव संपू शकतो, असे इराणने म्हटले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराणकडून एक महत्त्वाचे विधान समोर आले आहे. इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने आमची एक अट मान्य केली, तर अवघ्या सात दिवसांच्या आत होर्मूझची सामुद्रधुनी पुन्हा मालवाहतुकीसाठी खुली केली जाऊ शकते. हा मार्ग मोकळा झाल्यास जागतिक तेल बाजारावरील दबाव कमालीचा कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, होर्मूझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक बनली आहे. या मोक्याच्या सागरी मार्गावरून होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक कमालीची मंदावली आहे. नुकतेच या परिसरातून प्रवास करणाऱ्या दोन जहाजांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. अमेरिका-इराण संघर्ष तीव्र होण्यापूर्वी या सामुद्रधुनीतून दररोज टँकर, गॅस वाहक आणि कंटेनर जहाजांसह सुमारे 125 मोठी व्यापारी जहाजे जात असत. मात्र, सध्या सुरक्षेच्या कारणास्तव ही संख्या घसरून केवळ दोनवर आली आहे.


























































