मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार पुन्हा उघड; पळसदरी-कर्जतदरम्यान लोकल तासभर ठप्प, MRI पाईपमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<< अजय गायकवाड

मध्य रेल्वेच्या खोपोली-मुंबई सीएसएमटी लोकलमध्ये मंगळवारी सायंकाळी मोठा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे पळसदरी व कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान लोकलसेवा तब्बल एक तास ठप्प झाल्याने शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अंधार पडल्याने अनेक प्रवाशांनी जीव धोक्यात घालून मोबाईल टॉर्चच्या उजेडात रेल्वे रुळांवरूनच पायी कर्जत स्टेशन गाठले. पुन्हा एकदा मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला.

रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोपोली स्थानकातून सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी मुंबई सीएसएमटीकडे रवाना झालेली लोकल पळसदरी स्थानक सोडल्यानंतर कर्जत स्थानकाच्या अलीकडे सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर अचानक थांबली. तपासणीदरम्यान मोटरमनला MRI पाईपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे खबरदारी म्हणून लोकल मार्गातच थांबविण्यात आली.

दरम्यान, अंधार पडल्याने लोकलमधील प्रवाशांमध्ये अस्वस्थता पसरली. बराच वेळ कोणतीही हालचाल न झाल्याने अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात पायी कर्जत स्थानकाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनाही या प्रकाराचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

रेल्वेच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी पोहोचून बिघाड दूर केल्यानंतर सुमारे एक तासाने 7.20 ला लोकल पुन्हा सुरू झाली. या घटनेमुळे खोपोली-कर्जत मार्गावरील लोकल वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेसह रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मध्य रेल्वेने अशा घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.