
भरधाव कारने पोलीस हवालदारासह एक महिला आणि इतरांना धडक दिल्याची घटना मुंबईतील खार रोड स्टेशन परिसरात घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून, अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कारचा चालक आणि मालक दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश यादव (36) असे चालकाचे तर मेहुल प्रवीणचंद्र जोशी (50) असे मालकाचे नाव आहे.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कारने प्रथम 19 वर्षीय तरुणीला धडक दिली. या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित हवालदाराने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कारने हवालदारासह 2 ते 3 जणांना धडक दिली. यानंतर तेथे उभ्या असलेल्या दोन ते तीन रिक्षांना कारने धडक देत थांबली.
याप्रकरणी चालक दिनेश यादव आणि मेहुल प्रवीणचंद्र जोशी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायदा यांच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिनेश यादवला अटक करून न्यायालयात हजर केले, त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, पोलिसांनी मालक मेहुल प्रवीणचंद्र जोशी यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे.



























































