भरधाव ट्रकची कारला समोरासमोर धडक, डॉक्टरसह पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
accident

भरधाव ट्रकने कारला समोरासमोर धडक दिल्याने डॉक्टरसह पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या बारां जिल्ह्यातील कवाई-अत्रू महामार्गावर मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात कारचाही चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. सुरेश गजराज, डॉ. शालिनी मौर्य, स्वप्निल आणि निलिशा अशी मयत कुटंबाची नावे आहेत. हे कुटुंब मूळचे झुंझुनू जिल्ह्यातील सुरजगड येथील असून ते जयपूरमध्ये राहत होते. छब्रा येथे जात असताना त्यांच्या कारला ट्रकने धडक दिली. स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनाचे अवशेष बाजूला केले. वाहनातून मृतदेह बाहेर काढून अत्रू उप-जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात नेण्यात आले. पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला असून, फरार ट्रकचालकाचा शोध घेत आहेत.