
वैश्विक
चंद्राचं खरं वैज्ञानिक रूप समजल्यापासून त्यावरच्या ‘ससा’ आणि ‘हरणा’च्या गोष्टी मागे पडल्या. हे सगळे मोहक आकार प्रत्यक्षात काही टेकडय़ा किंवा खाचखळगे आणि विवरं आहेत. याची कल्पना आल्यावर ‘चंद्रमुखी’ हे वर्णन अप्रस्तुत ठरलं. चंद्राचं खरं ‘मुख’ किंवा ‘फेस’ म्हणजे पृष्ठभाग अर्थात सरफेस इतका काही व्याकुळलेला असेल की विचारू नका.
साधारण काही अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीपाठोपाठच तिचा हा सहकारी जन्मला. आधी तो पृथ्वीच्या अगदी जवळ होता. नंतर बराच लांब म्हणजे सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटरवर जाऊन स्थिरावला. तो ‘सहकारी’ अशासाठी की, पृथ्वीवरच्या भरती-आहोटीला मदत करतो. पृथ्वीवरच्या काही रात्री मंद प्रकाशाने उजळवतो आणि आता तर माणसाने पादाक्रांत केल्यापासून त्याचं पुढचं वसतीस्थान ठरणार की काय याची वाट बघत आहे.
पृथ्वीच्या सुमारे एक चतुर्थांश वास असलेल्या चंद्राचं गुरुत्वाकर्षण एक षष्ठांश तर वातावरण असं नाहीच. त्यामुळे दिवसाचं आकाश ‘निळं’ दिसायला, सूर्यप्रकाशातल्या निळय़ा रंगाचं जे विकिरण होतं ते चंद्रावर संभवतच नाही. त्यामुळे चंद्रावरच्या दिवसाही जिथलं आकाश काळच दिसतं. अशा कितीतरी गमतीजमती चंद्राविषयी सांगता येतील.
चंद्र स्वःभोवती आणि पृथ्वीभोवती सारख्याच वेगाने फिरत असल्याने त्याची एकच बाजू सतत पृथ्वीकडे असते. परिणामी चंद्रावरच्या बहुतेक ठिकाणांहून ‘उगवलेली’ पृथ्वी स्थिरच दिसते. मात्र चंद्र थोडासा हेलकावे खात असल्याने त्याच्या 27 दिवसांच्या महिन्यात पृथ्वीची जागा किंचित बदलते. चंद्रावरून सागरवेष्टित पृथ्वी निळी दिसते. सूर्यप्रकाश पृथ्वीवरून चंद्रावर परावर्तित स्वरूपात दिसतो. पृथ्वीचे हे चांदणे तीक्र असते कारण पृथ्वी सुमारे 30 टक्के सूर्यप्रकाश परावर्तित करते. चंद्र मात्र 10 ते 12 टक्केच करतो. यामुळे पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीवरून जेवढा दिसतो त्याच्या तुलनेत पृथ्वीची पौर्णिमा कैकपटींनी मोठय़ा आकाराची असते. पृथ्वीच्या या ‘चांदण्या’स ‘अर्थशाइन’ किंवा ‘पृथ्वीतेज’ म्हणतात.
असा हा काव्यमयतेपासून विज्ञानापर्यंत आपल्या जीवनाशी निगडित असलेला चंद्र खरोखरच खूप सहनशील आहे. माणसाने पाठवलेली यानं, माणसांच्या पावलांचे ठसे किंवा त्यांनी मारलेल्या उडय़ा काहीच नव्हेत. अनेक मानवी ‘इम्पॅक्ट प्रोब’नी दिलेल्या ‘धडका’सुद्धा (बिचाऱया) चंद्राने सहन केल्या आहेत.
परंतु त्यापेक्षा निसर्ग त्याचा अधिक अंत बघतो. तोही रोजच्या रोज. एका चांद्र दिवसात त्याच्या पृष्ठभागावर ‘लिंमपॉन्ग’च्या बॉलच्या आकाराचे किमान शंभर दगड-धोंडे आदळत असतात. चंद्रावरचं वातावरण फारच विरळ असल्याने पृथ्वीच्या वातावरणाशी घर्षण होऊन छोटे दगडगोटे जळून राख होऊन बहुदा समुद्रात पडतात. चंद्राचं तसं नाही. त्याला अशा 100 ‘मिटिअर’सह सुमारे 1100 टन अवकाशी धूळही सहन करावी लागते.
या सगळय़ा रोजच्या ‘माऱया’चं वजन सुमारे 33 टन इतकं भरतं. वातावरण नसल्याने चंद्राला या ‘फटक्यां’चा वेगही कमी करता येत नाही. सेकंदाला कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 72 किलोमीटर वेगाने असे दगडधोंडे चंद्रावर सतत आदळत असतात.
त्यामुळे 2024 मध्ये 11 एप्रिल ते 22 मे या काळात ‘मॅक्-गेटचिन’ नावाचं एक मोठं विवर तयार झालं. 728 फूट रुंद आणि 141 फूट खोलीचा प्रचंड खड्डा चंद्रावर पडला. तिथे अशी मोठी विवरं साधारणतः 130 वर्षांत एक या प्रमाणात निर्माण होतात.
हे जे उत्पाती विवर चंद्रावर तयार झालं ते करणारा ‘तो’ अशनी 3 ते 6 मजली इमारतीएवढा प्रचंड होता. मात्र या ‘धडके’ला वैज्ञानिक जगतात दुजोरा मिळाला तो आत्ता आत्ता म्हणजे गेल्या 2024 च्या सप्टेंबरात ‘ल्युनार रिकॉन्सन्स ऑर्बिटर’ यानाने त्याचा शोध लावला आणि 24 ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांचा फोटो प्रसिद्ध झाला. चांद्रपृष्ठाचा अभ्यास करणाऱया शास्त्र्ाज्ञांना मात्र या ‘इम्पॅक्ट’ने अभ्यासासाठी नवीन खाद्य दिलं आहे. रॉबर्ट वॉग्नर याना ‘ल्युनार ऑर्बिटर’ने पाठवलेल्या छायाचित्रात या विवराचा फोटो दिसल्याने शतकात एखाद् वेळेसच घडणारी घडना म्हणून अभ्यासकांना आनंद झालाय.
चंद्रावरच्या निर्जीव खडक-मातीला तरी त्या आघाताच काय होय! चांद्रपृष्ठ ते सारं सहन करतंय. पण उद्या चंद्रावर जाऊन वसाहती करण्याची स्वप्न पाहणाऱयांनी, रोजच्या पिंगपॉन्ग बॉलएवढय़ा मोठय़ा दगडांचा वर्षाव कसा सहन करायचा याचा विचार करून तेवढी भक्कम ‘मिटिअर प्रूफ’ कॅप्सून बनवली पाहिजे. त्यातून दुर्दैवाने असा मोठा अशनी कोसळला तर काय यावरही अभ्यास करूनच मंडळी चांद्रपर्यटनाला निघतील, अशी आशा करूया.


























































