गेल्या काही दिवसांपासून गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यातील वादळाची चर्चा जागोजागी रंगू लागली आहे. रंगलेल्या या चर्चांमध्ये घरातील जवळची नातेवाईक मंडळी गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटामध्ये मात्र तथ्य नसल्याचे बोलत आहेत. तर दुसरीकडे मात्र या सर्व चर्चा केवळ तात्पुरत्या असल्याचेही समजते आहे. यातील मुख्य बाब अशी की, सुनीता आहुजा यांना बिग बाॅस या रिअॅलिटी शो मध्ये जाण्याची संधी मिळणार असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे केवळ पब्लिसिटी स्टंट म्हणून हा सर्व घाट घातला जात असल्याचे सूत्रांकडून समजते.
सुनीता आहुजा या स्वतः गेली काही दिवस सोशल मीडियावरील पाॅडकास्ट आणि मुलाखतींमधून अचानक दिसू लागल्या आहेत. या प्रत्येक मुलाखतींमध्ये त्यांनी काही ना काही गौप्यस्फोट करुन माध्यमांमध्ये वर्णी लावली आहे. गोविंदा यांचे विवाहबाह्य संबंध, सासरच्यांसोबत असलेला बेबनाव, गोविंदा यांच्यावरील त्यांचे प्रेम अशा अनेक मुद्द्यांवर बोलून सुनीता आहुजा प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.
गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला 37 वर्षे झाली असून, त्यानंतर घेण्यात येणारा घटस्फोट हा ग्रे डिवोर्स म्हणून ओळखला जातो. त्यावरही आता सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे. एकंदरच काय तर, सुनीता आहुजा यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे अभिनेता गोविंदाच्या बरोबरीने त्यांनाही चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.
सुनीता आहुजा या कायमच त्यांच्या परखड आणि स्पष्ट बोलण्यासाठी ओळखल्या जातात. गोविंदा आणि सुनीता कोणत्याही कार्यक्रमामध्ये मुलाखतीसाठी गेल्यावर, त्या कार्यक्रमांमध्येही सुनीता यांनी अनेकदा परखड भूमिका मांडली आहे. गोविंदा यांच्यावर बोलताना सुनीता आहुजा यांनी माध्यमांसमोर कुठलाही आडपडदा न ठेवता वेळोवेळी स्फोटक वक्तव्ये केली आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या घटस्फोटाच्या वक्तव्यानंतर, त्यांच्या दोघांच्याही मॅनेजरकडून मात्र या वृत्ताला कुठेही दुजोरा देण्यात आलेला नसल्यामुळे, हा नेमका कल्ला कशासाठी चालला आहे असा प्रश्न आता गोंविदाच्या चाहत्यांना पडला आहे.
(कृपया या बातमीसाठी बायलाईन देऊ नये)






























































