
वसईतील वालीव येथे आपल्या बहिणीवर गोळीबार करून दिव्यात पळून आलेल्या आरोपीच्या बाईकमधील डिक्कीमध्ये जिवंत हॅण्ड ग्रेनेड असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ठाणे पोलिसांनी वेळीच धाव घेऊन हे हॅण्ड ग्रेनेड निकामी केल्याने पुढील अनर्थ टळला. या आरोपीचे नाव शिवदयाळ विश्वकर्मा उर्फ बबलू असे आहे. वसईच्या पोलिसांनी दिव्यात येऊन त्याला अटक केली असून त्याची सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्याचा घातपात घडवण्याचा कट होता काय याचाही शोध घेतला जाणार आहे.
दिव्यातील साबे गाव येथे राहणारा शिवदयाळ विश्वकर्मा याने २ जानेवारी रोजी वालीव येथे आपल्या बहिणीवरच गोळीबार केला होता. त्याच्यावर घाटकोपरच्या पंतनगर पोलीस ठाण्यातही यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याची शिक्षा भोगल्यानंतर तो दिव्यात राहायला आला होता. त्याने आपल्या बहिणीवर गोळीबार केल्यानंतर तो दिव्यात घरी परतला. याप्रकरणी वालीव पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी दिव्यामध्ये आले होते. तांत्रिक बाबी तपासल्यानंतर पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
हॅण्ड ग्रेनेड कुठून आणले?
पोलिसांनी शिवदयाळ विश्वकर्मा याच्यावर प्रश्नांचा भडीमार करताच त्याने गुन्हा कबूल केला असून हॅण्ड ग्रेनेड कुठून आणले, ठाणे शहर व परिसरात कुठे घातपात करण्याचा डाव होता काय याचा छडा लावण्यात येत आहे. दरम्यान पुढील तपासासाठी त्याला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ट्र पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.
मोठी दुर्घटना टळली
पोलिसांनी शिवदयाळ याच्या घराजवळ लावण्यात आलेली बाईकही तपासली. या बाईकमधील डिक्कीची झडती घेताना पोलिसांना चक्क जिवंत हॅण्ड ग्रेनेड लपवल्याचे दिसून आले. मुंब्रा पोलिसांनाही तातडीने ही बाब कळवण्यात आली. गोळीबाराच्या गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीकडे हॅण्ड ग्रेनेड सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले. ठाणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तातडीने धाव घेऊन हॅण्ड ग्रेनेड निकामी केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
पैशांचा तगादा
पंतनगरमध्ये राहात असताना शिवदयाळ याने त्याच्या पत्नीचा २०१८ मध्ये खून केला होता. याच खून प्रकरणात तो कारागृहात होता. जामिनावर सोडण्याची विनंती त्याने बहीण पुष्पाकडे केली होती. त्याला सोडवण्यासाठी बहिणीने दीड ते दोन लाखांचा खर्च केला. कारागृहातून बाहेर आल्यावर तुझे पैसे देतो असे त्याने बहिणीला सांगितले होते. मात्र कारागृहातून बाहेर आल्यानंतर बहिणीने त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला असल्यामुळे शिवदयाळ याने बहिणीला ठार मारले.


























































