अनुबंध; प्रतिज्ञेतला फोलपणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>गौरी सरनाईक

रोजच्या आयुष्यातलं जगणं सोपं करण्याऐवजी अकारण आपण काही शब्दांनी किचकट, क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं करून टाकत असतो. शपथा, प्रतिज्ञा, भीष्मप्रतिज्ञा या अशा गुंतागुंतीला हातभार लावतात. भावनेच्या भरात आपण सहजच शपथा घेऊन काही तरी गर्जना करत असतो, पण त्यांचं पालन होत नाही. खेदाची बाब म्हणजे त्यांचं वैषम्यही वाटत नाही. वास्तविक भीष्माचार्य आणि प्रभू श्रीरामचंद्र यांनी वचनपूर्तीसाठी, प्रतिज्ञापालनासाठी किती हालअपेष्टा सहन केल्या, त्याग केला याचा खूप मोठा इतिहास आपल्यासमोर आहे. ऊठसूट शपथा घेऊन आणि मोडून प्रतिज्ञेपासून परावृत्त होऊन या शब्दांचं महत्त्वच आपण संपवून टाकत असतो.

जीव गेला तरी त्या घरात पुन्हा पाय ठेवणार नाही’ ही माझी प्रतिज्ञा आहे. मी असा पण केला आहे, शपथ घेतली आहे. अशा प्रकारच्या प्रतिज्ञा फक्त चित्रपटातच नाहीत, तर प्रत्यक्ष जीवनात कितीदा घेतल्या जातात. खरंच, का असं वाटत असावं? हा प्रश्न विचाराधीन आहे. नाही वागू शकत आपण असं. वचन मोडलं, प्रतिज्ञा भंग पावली की, आपण अनेक कारणं देत असतो. त्यानं मला सॉरी म्हटलं आणि मी त्याला माफ केलं. कोण मागतं तुम्हाला स्पष्टीकरण? कशाचा एवढा आदेश असतो की, अशा प्रतिज्ञा केल्या जातात, वचनं दिली जातात. महाप्रतापी कृतनिश्चयी युवराज देवव्रत. पित्याच्या सुखासाठी आजन्म ब्रह्यचारी राहेन आणि सिंहासनाची सेवा करेन, अशी प्रतिज्ञा घेऊन तसेच शेवटपर्यंत वागले ते आणि फक्त तेच भीष्मपितामह. अनेक मोहाचे क्षण मागे सारून स्थिर राहिलेले भीष्माचार्य. आज हजारो वर्षं उलटली, पण प्रतिज्ञा किंवा वचन पाळणारे फक्त दोघेच. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि महाप्रतापी भीष्म. आपण रोज हे मी करणार नाही, इतकी साधी गोष्टदेखील तासाभरासाठी पाळू शकत नाही. अशांनी वृथा प्रतिज्ञा, शपथ, वचन या सर्व गोष्टींच्या मागे जाऊ नये आणि उगाचच स्वतःच हसं करून घेऊ नये. कुठल्या परिस्थितीत देवव्रतांनी अशी भीष्मप्रतिज्ञा केली असेल, याचा जरा वेगळय़ा अंगाने विचार करण्याची निकड आहे. सुंदर रूप, प्रतिष्ठत राजघराणं, कुरुवंशाचा एकुलता एक, प्रजेचा लाडका युवराज, केवळ मोहवश पित्याच्या होणाऱया सासऱयाला एका क्षणात वचनबद्ध होतो. कसं आजन्म वचन त्यांनी पाळलं असेल? फक्त आणि फक्त भीष्मपितामहच हे करू शकतात.
मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांनीदेखील केवळ पित्यानं माता कैकयीला दिलेल्या वचनपूर्तीसाठी राजसिंहासनाचा लोभ सोडून वनवासगमन केले, ही सारी उदाहरणं डोळय़ासमोर असूनही आपण अशी वल्गना करतो. क्षणभराच्या क्रोधासाठी उच्चारली जाणारी प्रतिज्ञा किंवा दिली जाणारी वचनं पाळली जात नाहीत. म्हणूनच ते भीष्म आहेत, श्रीराम आहेत. देवत्व असलेले किंवा एक आदर्श लोकांसमोर ठेवण्यासाठी देवानं घेतलेले अवतार आहेत. आपण सर्वसामान्य आहोत. मग अशा प्रतिज्ञा का करतो? परवा असंच झालं. माझी एक चांगली मैत्रीण आहे, नातं दूरचं असलं तरी मैत्री जास्त आहे. थोडी तापट आहे ती. तिच्या नणंदेशी तिचा काही तरी कारणावरून वाद झाला. तावातावानं फोन करून तिनं मला सगळा वृत्तांत सांगितला. खरं तर तिची नणंद माझी चांगली मैत्रीण आहे. एकदम सामाजिक व्यक्तिमत्त्व. सर्वांना मदत करणारी वगैरे, तर माझी मैत्रीण मला म्हणाली, ‘हे बघ काहीही झालं ना, तरी त्या माझ्या नणंदेला आणि तिच्या यजमानांना मी आता माझ्या घरी बोलवणार नाही. अगदी मी गेले तरी त्यांना बोलवायचे नाही. ही माझी अगदी भीष्मप्रतिज्ञा समज.’
मी तिला शांत करायचा प्रयत्न करीत होते, ‘अगं, एवढी टोकाची भूमिका घेऊ नको आणि भीष्मप्रतिज्ञा वगैरे तर नकोच नको. आपण मार्ग काढू. बोलूया शांतपणे.’ पण ती ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी मी शांतपणे फोन ठेवून दिला. वादळ शांत व्हायची वाट बघत बसले.
काही दिवसांतच सारं काही व्यवस्थित. तिच्या नणंदेच्या शेतावरदेखील आम्ही जाऊन आलो. भीष्मप्रतिज्ञा करणारी माझी मैत्रीण शेतातील सहलीत चांगली मजेत होती. काय अर्थ आहे अशा वृथा वल्गनेला, पण भीष्मप्रतिज्ञेचा हा उपहास मला मात्र लिहिता करून गेला.
आजकाल तर लग्नात घेतलेली वचनं सहा महिनेसुद्धा पाळताना दिसत नाहीत. सगळा कारभार फिल्मी झालेला आहे. मरताना वचन दिलंय तुझ्या वडिलांना म्हणून लग्न केलंय. मला तू काही बाबतीत योग्य वाटत नाहीस. एक उपकारांची, वचनांची पूर्ती आणि सारं आयुष्यभर हेच ऐकविणारी एक जमात असते. ती बाई बिचारी या दिलेल्या वचनांच्या, प्रतिज्ञांच्या जाळय़ात सारं जीवन जगते. आपले राजकारणी याहून वेगळे नाहीत. निवडणुका आल्या की, त्यांच्या प्रतिज्ञा, वचनांची शेती बहरते, पण नंतर मात्र काहीच नाही. त्यांच्या या प्रतिज्ञा, वचनं निव्वळ पाण्यावरील क्षणकाळ उठणारे बुडबुडे असतात.
डॉक्टर्स महाविद्यालयतून शिक्षण संपल्यावर पदवी घेण्यापूर्वी मी गोरगरीबांची सेवा करेन अशी प्रतिज्ञा घेतात, पण पुढे काय? या प्रतिज्ञांना ते किती न्याय देतात? म्हणूनच वाटतं, साधं जगावं, साधं बोलावं. साधासाच दिलेला एखादा शब्द, प्रतिज्ञा वगैरेच्या मखरात न बसविता पाळावा. आयुष्य सोप्पं होऊन जाईल, पण कोणी माँ का लाल हे मानतं नाही. प्रतिज्ञा करणारे आणि पाळणारे आता काळाच्या आड गेलेले आहेत, त्यांचे अनुकरण न केलेले बरे.
प्रेमप्रकरणातल्या प्रतिज्ञा तर खूपच हास्यास्पद असतात. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत, अशी प्रतिज्ञा करणारे प्रेमवीर आज जागोजागी सापडतात, पण हेच पुढे शोकांतिकेचे बळी पडतात. आजवर अशा प्रेमकहाण्या हजारोंनी झालेल्या आहेत. यांची प्रेरणास्थाने म्हणजे आपल्या दूरदर्शनाच्या मालिका. जातीभेद पाळून लग्न दाखविणे, श्रीमंत-गरीब दाखवून प्रतिज्ञापूर्वक विवाहास भाग पाडणे, हे सारं काही फारच हास्यास्पद आहे. यातून अपरिपक्व विचारांची मुले-मुली या प्रतिज्ञेच्या चक्रात अडकवतात. त्यांचंच अनुकरण केलं जातं आणि दरदिवशी वर्तमानपत्रात बातमी येते. हे सारं फार म्हणजे फारच विचित्र आहे. समजावून सांगणे आणि समजून वागणे याचे तारतम्य नाहीच मुळी राहिलेलं.
एवढं निश्चितच समजून घ्यावं की, प्रतिज्ञा काय किंवा वचनं काय ती घेताना त्यांचं आपल्याकडून पालन होईल का? तरच करावं. मी देवाची, माझ्या मुलांची शपथ घेते, हे मी केलंच नाही, अशा प्रकारची भाषा आमच्या नर्सिंग होममध्ये नेहमीच बोलली जात असे. मी रागवायचे त्यांना, का गं ऊठसूट मुलांच्या, देवाच्या शपथा घेता आणि वर चोरी करता. खरं काय ते सांगा, पण स्टाफपैकी एकही कोणी खरं सांगायचं नाही. गीतेवर हात ठेवून मी शपथ घेतो की, असे म्हणणारे अनेकजण खोटं बोलतात, खोटी साक्ष देतात. मग हा अट्टहास का? का त्या शब्दांचं पावित्र्य कमी करायचं? का रिवाज म्हणून असं बोलायचं. खरं तर असं करू नये, यात निश्चितच बदल होणं अपरिहार्य आहे.
अगदी मनापासून आणि खरं सांगावंसं वाटतं, हे सगळं बंद व्हायला पाहिजे. आपण असं वागून ज्यांनी प्रतिज्ञा, वचन देऊन किंवा घेऊन आपली आयुष्य पणाला लावलीत त्यांचा अपमान करू नये. विचार करूया आणि सुधारणा घडवून आणूया.