प्रस्ताव परत पाठवले, पण ते रद्द करणं गरजेचं! मुंबईतील रक्तपेढ्यांचे खासगीकरण आणि मोकळ्या मैदानांचे आरक्षण बदलण्यावरून आदित्य ठाकरे आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील रक्तपेढ्यांचे खासगीकरण आणि मोकळ्या मैदानांचे आरक्षण बदलण्याच्या प्रस्तावांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कडाडून विरोध केला. अखेर मुंबई महापालिकेच्या सुधार समितीत हे प्रस्ताव मागे घेण्यात आले आहेत. पण हे सर्व प्रस्ताव रद्द करणं गरजेचं आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदे पुन्हा आक्रमक भूमिका घेतली.

पहिला प्रस्ताव होता एक मोकळं मैदान वांद्रे पूर्वमधील जिथे फुटबॉल खेळतात. हजारो फुटबॉलर्स प्रत्येक वर्षी खेळतात. वेगवेगळ्या टुर्नामेंटमध्ये खेळतात, अनेकजण तिथून देशाच्या टीमसाठी खेळलेले आहेत. त्या मैदानावर त्यांना तिथे एक्झिबिशन सेंटर करायचं होतं. म्हणजे कन्स्ट्रक्शन करायचंय, कॉन्ट्रॅक्टरला द्यायचंय, मग पुढे कोणाला तरी द्यायचं होतं. ते आज आम्ही हाणून पाडलं आहे. तो प्रस्ताव घेतला नाही. दुसरा प्रस्ताव होता जो म्हणजे मलबार हिल इथे एक मोकळं मैदान आहे, उद्यान आहे. आणि तेच रिक्रिएशन ग्राउंड बाजूला एका उद्योगपतीचा बंगला बनतोय. आणि त्या उद्योगपतीला तिकडचा एफएसआय पाहिजे. तेच मोकळं मैदान त्याच्या बंगल्याच्या आत पाहिजे म्हणून मुंबईकरांना बाहेर ठेवायचं आणि ते मैदान स्वतःच्या अंगणात हा जो दुसरा प्रस्ताव होता आम्ही हाणून पाडलेला आहे. आणि तिसरा प्रस्ताव म्हणजे वर्षा बंगल्याच्या काही फुटावर एका सोसायटीच्या बाजूला एक हरित पट्टा होता ते देखील कन्व्हर्ट करून रेसिडेन्शियलमध्ये करायचं हा प्रस्ताव हाणून पाडला. पण याहूनही पुढे जाऊन अजून एक भयानक प्रस्ताव जो खासगीकरणाचा होता तो म्हणजे रक्तपेढ्यांचा. मुंबई महापालिकेच्या रक्तपेढ्या आतापर्यंत मोफत असायच्या. सगळ्या रुग्णांना आपण मोफत पिशव्या द्यायचो. आणि मुंबईकारांचं रक्त ज्यांनी रक्तदान केलेलं आहे, अनेक पक्ष असतील, अनेक सामाजिक संस्था असतील, अनेक एनजीओ असतील हे सगळे रक्तदान करतात आणि त्यात नेहमी शिवसेनेचा पुढाकार राहिलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच २०१० सालचा रक्तदानामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे. वंदनीय हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे त्या निमित्ताने अनेक लोकांनी रक्तदान शिबिरं घेतलेली आहेत. आणि हे रक्त आपण सगळं रक्तदान करून या रक्तपेढ्यांना देतो. आणि तीच मुंबई महापालिका, तीच सुधार समिती याचं आज प्रस्ताव आणणार होती की, याचं खासगीकरण करून जे मोफत आपण रुग्णांना देणार होतं त्यांना कमीत कमी ११०० रुपये आणि जी काही महागाई वाढत चाललीय त्यानुसार दर वाढवायचे. या सगळ्या प्रस्तावांचा आम्ही विरोध केला, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मी काल देखील पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की, यात ज्या पक्षांचा हात नसेल ते सगळे विरोध करतील. आज आनंद आहे की आज सुधार समितीमध्ये हे सगळे प्रस्ताव पुन्हा पाठवले गेलेले आहेत. पण यांना रद्द करणं गरजेचं आहे. तर आणि तरच मान्य करेन की हे सगळे प्रस्ताव पुन्हा मागे घेतले गेलेले आहेत. हे एक मोठं यश आम्हाला मिळालेलं आहे. मुंबईकरांचा पहिला टप्पा हा यशस्वी ठरलेला आहे. पण प्रत्येक अशा प्रस्तावावर आमची नजर राहिल. आणि यात कोणाचा हात आहे, मग भाजचा हात आहे की मिंधेंचा हात आहे? हे स्पष्ट होत जाईल आणि लोकांसमोर येत जाईल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

अधिवेशन सुरू असताना एका मैदानासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. जी कालची पत्रकार परिषद घेतली त्यानंतर त्यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि त्यांनी याची दखल घेतल्याचं ऐकलं. भाजपला पण आवाहन केलं होतं की जर त्यांचा या प्रस्तावाला पाठिंबा नसेल तर त्यांनी याचा विरोध करणं गरजेचं आहे. त्यांनी दखल घेतली असेल तर आभार मानेन. पण महत्त्वाची गोष्ट आता काही करण्यापेक्षा किंवा बोलण्यापेक्षा जेव्हा खरोखर हे तिन्ही प्रस्ताव आरजी टू रेसिडेन्शियलचे रद्द होतील आणि रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाचे प्रस्ताव रद्द होतील, त्यावेळी मी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे जाहीरपणे आभार मानेन, असे आदित्य ठाकरे म्हणाले.