सत्ताधारी पक्षाची वागणूक ‘तशीच’,आदित्य ठाकरेंनी ठणकावलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना सभागृहात असंसदीय शब्द वापरल्याच्या आरोपावरून अधिवेशन काळाकरिता निलंबित करण्यात आले आहे. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. सभात्याग केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ”मुख्यमंत्र्यांचा घोटाळा, राज्यपालांनी केलेला महापुरुषांचा अपमान हा सभागृहाच्या रेकॉर्डवर येऊ नये म्हणून स्वत: सत्ताधारी पक्ष सभागृहात गोंधळ घालून सभा तहकूब करत आहे”, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे. तसेच सत्ताधारी पक्षाची वागणूक ही त्या शब्दासारखीच आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

”मी पहिल्यांदाच बघितलं आहे की सत्ताधारी पक्ष हा पायऱ्यांवर उभा राहून घोषणा देतोय. वेलमध्ये उतरून आंदोलनं करतोय. माझ्या सोबत जे दिग्गज नेते आहेत त्यांना देखील हे बघून धक्का बसला आहे. महाविकास आघाडीने मुख्यमंत्र्यांचा घोटाळा सर्वांसमोर आणला आहे. म्हणूनच सत्ताधारी पक्ष म्हणजेच गद्दार गट व भाजप हे सतत गोंधळ घालून हाऊस तहकूब करण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी देखील जो काही घोटाळा तो आम्ही तुमच्यासमोर आणणारच आहे. आम्हाला कशावरही ते बोलू देत नाहीए. मुख्यमंत्र्यांच्या घोटाळ्यावर, सीमावादावर, कर्नाटकव्याप्त महाराष्ट्रातील भागावर, गेलेल्या प्रकल्पांवर, महापुरुषांच्या अपमानावर कशावरही ते बोलू देत नाहीएत. मग आम्ही नक्की बोलायचं कुठे आणि कसं?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

“यापेक्षा सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जयंत पाटील साहेबांना आज त्यांनी निलंबीत केलं. त्यांनी जो असंसदीय शब्द वापरला असा त्यांचा आरोप आहे. मागे मी देखील असा एक शब्द वापरला होता तेव्हा मला तो शब्द मागे घ्यायला लावला होता. पाटील साहेबांनी निर्लज्ज शब्द वापरला म्हणून त्यांना निलंबीत केलं असं त्यांचं म्हणनं आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषी गद्दार मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया ताईंसाठी जे शब्द वापरले त्यावर यांच्यापैकी कुणीही काडीमात्रं बोललेलं नाही. खरंतर असे शब्द वापरल्यावर पश्चाताप होतो. आपण ते मागे घेतो. पण यांच्याकडून कोणीही काहीही बोललेलं नाही. आज स्वत: आमचे नेते अजित दादांनी, जयंत पाटलांनी दिलगीरी व्यक्त केली. तरीदेखील त्या शब्दासारखीच सत्ताधारी पक्षाची वागणूक आहे. आम्ही त्यावर ठाम आहोत” असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

”कृषी मंत्री परत परत तो शब्द टिव्हीवर जाऊन बोलत होते. हे किती सभ्यपणाचं आहे? काही दिवसांपूर्वी एका गद्दार आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. त्याबद्दल हे काहीही बोलले जात नाही. हे सत्ताधारी राज्यपाल व घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांनी केलेला घोटाळा व राज्यपालांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य हे सभागृहाच्या रेकॉर्डवर येऊ नये म्हणून हे सत्ताधारी स्वत:च गोंधळ घालून सभागृह तहकूब करत आहेत. पहिल्यांदाच असं झालंय की सत्ताधाऱ्यांनी सभागृह तीन ते चार वेळा बंद पाडलंय. आम्ही त्याचा धिक्कार करतो. याचं गैरवर्तन आम्ही लोकांसमोर नेतच राहू”, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.