
पुण्याचे ग्रामदैवत मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. ‘श्रीं’च्या पालखीचे मानकरी होत त्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष केला.
आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आज गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आहे. ‘मी राजकारणावर काही बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील आजचे राजकारण खूप वाईट आहे. ते राज्यासाठी, विकासासाठी नक्कीच चांगले नाही. लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल इतके आजचे राजकारण वाईट होत आहे. राजकारण खालच्या पातळीवर आले आहे. त्याचा स्तर वरती आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, उत्सवी वातावरण आहे, त्यामुळे राजकीय विषय नको.’
यावेळी शिवसेना उपनेत्या आणि विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना पुणे संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, नगरसेवक विशाल धनवडे, प्रशांत बधे, बाळासाहेब भांडे, महिला आघाडी पदाधिकारी अनिता परदेशी, अश्विनी शिंदे, करुणा घाडगे उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या पुणे शहर पदाधिकाऱयांसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन करून आरती केली. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीतील ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण पाहिले.



























































