एअर इंडियाचे विमान विजेच्या खांबाला धडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशच्या गन्नवरम येथील विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना शनिवारी एअर इंडियाचे विमान धावपट्टीशेजारील विजेच्या खांबाला धडकले. या विमानातून 64 प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही इजा झालेली नसून विमानाचेही विशेष नुकसान झाले नाही, असे एअरपोर्ट डायरेक्टर जी मधुसूदन राव यांनी सांगितले. आंध्रच्या विजयवाडा विमानतळावर दुर्घटनाग्रस्त विमानातील 19 प्रवासी उतरणार होते. त्यामुळे सायंकाळी 5.50 वाजता विमान विजयवाडा येथे उतरले. मात्र उतरताना धावपट्टीशेजारील प्रखर विजेचे दिवे असलेल्या इलेक्ट्रिक पोलला धडक देत बोईंग पुढे गेले. सुदैवाने विमानाच्या पंखाचे किरकोळ नुकसान झाले. पण कोणताही मोठा अपघात होता होता वाचला. वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना झाली असावी असा अंदाज एअर इंडियाच्या प्रवक्त्याने व्यक्त केला. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही एअर इंडिया प्रशासनाने जाहीर केले आहे.