
आसामच्या सिल्चर विमानतळावर बुधवारी आलेल्या 690 प्रवाशांपैकी तब्बल 300 प्रवासी कोरोना चाचणी टाळून पसार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रवाशांपैकी 189 प्रवाशांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्यातील नऊजण कोरोना संक्रमित आढळले होते. आता आसाम पोलीस चाचणी टाळून पसार झालेल्या 300 प्रवाशांचा कसून शोध घेत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आसामच्या विमानतळावर उतरणाऱ्या विमान प्रवाशांना रॅपिड अँटीजेन चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. सिल्चर विमानतळाचा परिसर छोटा असल्याने विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी शेजारच्या टिकोल मॉडेल रुग्णालयात करण्यात येते. बुधवारी प्रवाशांना चाचणीसाठी हॉटेलमध्ये हलवतानाच काही प्रवाशांनी सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून विमानतळावरून पोबारा केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. आसाममध्ये बुधवारी कोरोनाचे 1,665 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कडक कोरोना चाचणीचा निर्णय अमलात आणण्यात येत आहे.

























































