अपघातग्रस्त कंटेनर उचलताना क्रेनच उलटला, संगमनेर तालुक्यातील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपघाती वळणावर उलटलेला कंटेनर उचलत असताना क्रेनच रस्त्यावर उलटल्याची घटना संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळाजवळ घडली आहे. सुदैवाने या अपघातातून क्रेनमधील दोनजण बचावले आहेत.

तळेगाव दिघे येथील बाजारतळानजीकच्या ओढय़ातील अरुंद पुलादरम्यान अपघाती वळण आहे. या अपघाती वळणावर रस्त्याच्या कडेला शुक्रवारी सकाळी मालवाहू कंटेनर उलटून अपघातग्रस्त झाला होता. कंटेनर मुंबई येथून साहित्य घेऊन नाशिककडून श्रीरामपूरच्या दिशेने जात होता. या अपघातातून कंटेनरचालक मोहम्मद दिलशाद (रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) व क्लीनर (नाव समजू शकले नाही) असे दोघे बचावले. अपघातग्रस्त कंटेनर उचलण्यासाठी शनिवारी क्रेनला पाचारण करण्यात आले होते. मात्र, कंटेनर उचलत असतानाच क्रेन रस्त्यावर उलटला व क्रेनचा काही भाग कंटेनरच्या हूडवर पडला. क्रेनमधील रामा रोकडे व नामदेव रामकर (रा. नान्नजदुमाला) हे दोघे युवक बचावले.

या घटनेनंतर मोठी वाहतूककोंडी झाली होती. स्थानिक युवकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी योगदान दिले. अपघातग्रस्त कंटेनर व रस्त्यावर उलटलेला क्रेन बाजूला घेईपर्यंत रस्त्यावर वाहनांची लांबच लांब राग लागली होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाने तळेगाव दिघे येथील अरुंद पुलाचे व अपघाती वळणरस्त्याचे त्वरित रुंदीकरण करावे; अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशार ग्रामस्थांनी दिला आहे.