
सामना प्रतिनिधी । जालना
माळी पिंपळगाव येथे लग्नासाठी मोटार सायकलवर जात असलेल्या तिघांना पाठीमागून भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास अंबड- वडीगोद्री रस्त्यावर झिरपी पाटीजवळील महादेव मंदिरासमोर घडली आहे. यामध्ये ज्ञानेश्वर ऋषींदर एखंडे (उपसरपंच), सुरेश रावसाहेब एखंडे, नारायण दत्तु एखंडे या तिघांचा (रा.बदापुर ता.अंबड जि.जालना) मृत्यू झाला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील बदापुर येथील उपसरंपच ज्ञानेश्वर एखंडे, सुरेश एखंडे, नारायण एखंडे हे तिघे मोटरसायकलने गावातील मुलाच्या लग्नाला गेवराई तालुक्यातील माळी पिंपळगाव येथे जात असताना अंबड तालुक्यातील अंबड-वडीगोद्री रस्त्यावर झिरपी पाटीजवळील महादेव मंदिरासमोरुन जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. या धडकेमुळे मोटारसायकलस्वार ट्रकसोबत सुमारे एक हजार फुटापर्यंत फरफटत गेले. त्यामुळे त्या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती अंबड पोलीसांना मिळताच पोलीसांनी पंचानामा करुन वाहतुक सुरळीत केली. मृतांचे मतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले. एकाच घरातील तिघांचा
मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.




























































