तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यानंतरही दररोज 250 विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत रुग्णसंख्या वाढत असताना आणि तिसऱ्या लाटेचा इशारा दिलेला असतानाही अजूनही शेकडो नागरिक सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता बेजबाबदारपणे फिरत असल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत दररोज सरासरी 250 जणांवर कारवाई करण्यात येत आहे. यात कोरोना काळात आतापर्यंत मुंबईत 33 लाख 19 हजार 587 जणांवर कारवाई झाली असून त्यातून पालिकेने 66 कोटी 78 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हा सर्वोत्तम उपाय असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे एप्रिल 2020पासून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यात मास्क न वापरणाऱयांकडून 200 रुपयांचा दंड वसूल केला जात आहे.