
पावसाळा अवघ्या दीड महिन्यावर आल्यामुळे पालिकेने पावसाळापूर्व कामे वेगाने करण्यास सुरुवात केली आहे. मात्र दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे कामे अर्धवट राहिल्यास मुंबईकरांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे पावसाळापूर्व कामे अर्धवट राहिल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने जाहीर केला आहे.
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून मार्चमध्ये सुरू होणारी नालेसफाई दोन आठवडे उशिरा सुरू झाल्याने 31 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. मात्र एकूण नालेसफाईपैकी 75 टक्के काम 31 मेपर्यंत पूर्ण करावयाचे असून यातील 45 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली, तर ठरलेल्या उद्दिष्टापैकी उर्वरित काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्यात येईल आणि 25 टक्के नालेसफाई पावसाळय़ात आणि पावसाळय़ानंतर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तर पावसाळापूर्व कामांमध्ये महत्त्वपूर्ण असणारी रस्ते, खड्डे, चर बुजवण्याचे काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने संबंधितांना दिले आहेत. तर जी कामे पूर्ण होणार नाहीत ती काम पावसाळय़ापूर्वी ‘सेफ स्टेज’मध्ये आणून ठेवावीत जेणेकरून मुंबईकरांना अर्धवट कामांचा त्रास होणार नाही, अशी माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
नालेसफाईच्या कामाचा वेग पाहता शिल्लक काम 31 मेपर्यंत पूर्ण होईल, तर रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजवणे, चर बुजवणे अशी कामेदेखील 31 मेआधी पूर्ण करावी, अन्यथा संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश बैठकीदरम्यान संबंधितांना देण्यात आले आहेत.
– अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त
पातमुख, मोठय़ा नाल्यांच्या होणार पुन्हा नालेसफाई
मिठी नदीमधील गाळ काढण्याचे काम 65 टक्के पूर्ण झाले आहे. हे काम द्विवार्षिक कंत्राटाप्रमाणे सुरू असून मार्चपासूनच गाळ काढला जात आहे. मात्र भरतीमुळे मिठी नदीत पुन्हा गाळ साचण्याची शक्यता असते. त्यामुळे 15 ते 31 मे यादरम्यान पातमुख, मिठी नदीची महत्त्वाची ठिकाणे आणि पाणी तुंबणाऱया ठिकाणी पुन्हा एकदा गाळ काढण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.




























































