
ड्रग्जप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) कोठडीत असलेल्या एजाज खानला कोरोनाची लागण झाली आहे. तर एजाजच्या संपर्कात असणाऱया अधिकाऱयाचीदेखील कोरोना चाचणी केली जाणार आहे.
गेल्या महिन्यात एनसीबीने ड्रग्ज तस्कर शादाब बटाटाला अटक केली होती. शादाबच्या चौकशीत एजाजचे नाव समोर आले होते. त्यानंतर एनसीबीने कारवाई करून एजाजला अटक केली होती. तो सध्या एनसीबी कोठडीत आहे. त्याच्या एनसीबी कोठडीची आज मुदत संपत आहे. एजाजची वैद्यकीय चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे वैद्यकीय अहवालात उघड झाले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. तर जे अधिकारी एजाजच्या संपर्कात आले त्या अधिकाऱयांचीही कोविड चाचणी केली जाणार असल्याचे एनसीबी अधिकाऱयाने सांगितले. काही महिन्यांपूर्वी सुशांत सिंह प्रकरणात तपास करत असताना एनसीबीच्या काही अधिकाऱयांना कोरोनाची लागण झाली होती.




























































