
सिनेअभिनेते पुनित इसर यांचा ई-मेल आयडी हॅक करून त्यांचे 13 लाख 76 हजार रुपये लुटण्याचा एका तरुणाचा डाव ओशिवरा पोलिसांनी उधळून लावला. इसर यांनी त्यांच्या नाटकासाठी केलेले बुकिंग परस्पर रद्द करून ते पैसे लाटण्याचा प्रयत्न त्याने केला होता, पण पोलिसांनी अभिषेक सुशीलकुमार नारायण (34) या भामटय़ाला बेडय़ा ठोकल्या.
पुनित इसर यांची शो मेन थेटर प्रोडक्शन नावाची कंपनी असून सदर कंपनीचा व्यवहार हा शोमनथिएटरजीमेल डॉट कॉम या ई-मेलद्वारे करण्यात येतो. इसर यांनी त्यांचे हिंदी नाटक जय श्रीराम या नाटकाच्या प्रयोगासाठी एनसीपीए थेटर बुक केले होते. 22 नोव्हेंबर रोजी एनसीपीए थेटरला मेल करण्यासाठी त्यांनी त्यांचा ई-मेल लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ओपन झाला नाही. तेव्हा त्यांचा ई-मेल आयडी हॅक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे तेसर यांनी ओशिवरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याची तत्काळ दखल घेत वरिष्ठ निरीक्षक मनोहर धनावडे, निरीक्षक सीमा सपुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर कुरकुटे तसेच अशोक कोंडे, विक्रम सरनोबत, सोनू पाटील या पथकाने तपास सुरू केला. पथकाने एनसीपीए थेटरचे प्रतिनिधीशी संपर्क केला असता त्यांना सदर ई-मेलने नाटकासाठी केलेली बुकिंग रद्द करून दिलेली रक्कम बँक खात्यात जमा करण्याबाबत सांगितल्याचे समजले. तेव्हा इसर यांचा ई-मेल हॅक झाला असल्याने कोणताही व्यवहार अथवा बुकिंग रद्द करू नये असे त्या प्रतिनिधींना सांगून इसर यांचे पैसे जाण्यापासून रोखले.





















































