
सामना ऑनलाईन । मुंबई
रिअल इस्टेट व्यवसायातील अनेक फसव्या दलालांकडून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आपण ऐकत असतो मात्र हिंदुस्थानातल्या एका प्रसिद्ध अभिनेत्यालादेखील जुहू येथे फ्लॅट देण्याच्या नावाखाली काही दलालांनी फसवल्याचे समोर आले आहे. भोजपूरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार रवी किशन याला मुंबईतील जुहू भागात फ्लॅट मिळवून देतो असे सांगत तीन दलालांनी दीड कोटींना फसवले आहे. रवी किशनने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली असल्याचे समजते.

रवी किशन यांनी जुहू हाय राईझ सोसायटीत फ्लॅट मिळविण्यासाठी कमला लॅण्ड मार्क ग्रुपचे जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांच्यासोबत व्यवहार केला होता. किशन यांनी फ्लॅटसाठी या तिघांना दीड कोटी रुपये दिले होते. मात्र पैसे घेऊनही फ्लॅट देत नसल्याने मुंबई पोलिसांच्या इकॉनॉमिक ऑफेन्स विंग (EOW) कडे तक्रार केली आहे.
कमला लॅण्ड मार्क ग्रुप व त्याच्याशी संबंधित रिअर इस्टेट कंपन्यांनी याआधी वर्सोवातील एक व्यावसायिक सुनील नायर याची देखील साडे सहा कोटींची फसवणूक केली आहे. पोलिसांनी नायर व रवी किशनची तक्रार एकत्र करून कमला लॅण्ड मार्क ग्रुपच्या जितेंद्र जैन, जिनेंद्र जैन, केतन शाह यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. नायर प्रकरणी पोलिसांनी या तिघांना नोव्हेंबर 2016 मध्ये अटक केली असून तेव्हापासून ते तिघेही न्यायालयीन कोठडीत आहेत, असे पोलिसांनी सांगितले.


























































