
दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिचा आज वाढदिवस. 7 नोव्हेंबर, 1981 ला जन्मलेल्या अनुष्का हिला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी अनेक बडे दिग्दर्शक एका पायावर तयार असतात. अनुष्का म्हणजे चित्रपट सुपरहिट अशीच धारणा दिग्दर्शकांची झालेली आहे. मात्र तिचा इथपर्यंतचा प्रवास संघर्षमय असाच होता.

अनुष्काने आयुष्यात मोठा संघर्षमय काळ पाहिला आहे. अनेक चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर तिने चित्रपट इंडस्ट्रीला रामराम करण्याचाही निर्णय घेतला होता.

विशेष म्हणजे अनुष्का शेट्टी हिला कधी अभिनयात कारकीर्द करायचीच नव्हती हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. तिच्या कुटुंबातील बहुतांश लोक इंजिनिअर किंवा डॉक्टर आहेत. त्यामुळे ती देखील सुरुवातीला यातच आपली कारकीर्द बनवण्याचा विचार करत होती.

ग्रॅज्युएट झाल्यानंतर अनुष्का हिने बराच काळ शिकवण्याही घेतल्या. तिसऱ्या इयत्तेतील मुलांची ती शिकवणी घ्यायची. त्यावेळी तिलाही आपण पुढे जाऊन अभिनयाच्या शिखरावर पोहोचू असे वाटले नसेल.

मुलांच्या शिकवण्या घेतल्यानंतर तिने लोकांना योगा शिकवण्यास सुरुवात केली. योगा शिकवण्याचा तो काळ आयुष्यातील सर्वात भारी काळ होता, असे आजही अनुष्का बोलून दाखवते. भरत ठाकूर यांच्याकडून तिने योगाचे शिक्षण घेतले होते.

योगा शिकवत असताना तिच्यातील कलागुणांना मेहर रमेश यांनी ओळखले. यानंतर त्यांनी पुरी जगन यांना अनुष्का हिचे नाव सुचवले आणि अशा पद्धतीने तिने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. ‘सुपर’ हा तिचा पहिला चित्रपट, मात्र तो काही विशेष प्रसिद्धी मिळवू शकला नाही.

यानंतर तिला ‘बाहुबली’ सारखा चित्रपट देणाऱ्या एस.एस. राजमौली यांची तिच्या आयुष्यात एन्ट्री झाली आणि तिला ‘विक्रमारकुडू’ (Vikramarkudu) यात भूमिका मिळाली. यानंतर तिने अनेक चित्रपट केले, मात्र ‘बाहुबली’मधील देवसेनाच्या भूमिकेने तिला प्रसिद्धी आणि पैसाही मिळवून दिला. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीचा अनुष्काच्या नावाचा समावेश होतो.




























































