
राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा असलेल्या नगर जिह्यात आता दोन ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय सुरू होणार आहे. राज्य सरकारने शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्तर नगरमधील नागरिकांची ससेहोलपट थांबणार आहे. मात्र, या निर्णयामुळे ‘शिर्डी जिल्हा’ होणार, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
क्षेत्रफळाने राज्यात सर्वांत मोठय़ा असणाऱ्या नगर जिह्याचे विभाजन केले जावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, उत्तर नगर जिह्यातील नेत्यांनी हा प्रश्न राजकीय केल्याने श्रीरामपूर की संगमनेर, या वादात विभाजन रखडले आहे. त्यात आता विखे-पाटील यांनी श्रीरामपूर आणि संगमनेर सोडून अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीसाठी मंजूर करून घेतले आहे. यामुळे अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यांतील नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांशी संबंधित कामे शिर्डीतच मार्गी लागणार आहेत. मात्र, या निर्णयाला श्रीरामपूरचे काँगेस नेते करण ससाणे यांनी विरोध केला आहे.
दरम्यान, शिर्डीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले म्हणून लगेच शिर्डी जिल्हा होणार हा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे. तर अपर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीत होत असल्याने ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.































































