मुद्रा – जगावेगळी बुद्ध्यांकसम्राज्ञी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अंजली महाजन

मेक्सिकोमधील अवघ्या तेरा वर्षांच्या अधारा पेरेझ सांचेझ या मुलीने आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर आज संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अधाराची बुद्धिमत्ता केवळ वयापेक्षा जास्त आहे असे नाही, तर तिचा बुद्ध्यांक म्हणजेच आयक्यू 162 इतका मोजला गेला आहे. हा आकडा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या बुद्ध्यांकापेक्षाही अधिक असल्याने तिला जगभरातून कौतुकाची थाप मिळत आहे.

सध्या मेक्सिकोमधून जगाला थक्क करणाऱया बुद्धिमत्तेची आणि जिद्दीची एक नवी कहाणी समोर येत आहे. अधारा पेरेझ सांचेझ ही अवघ्या अकरा वर्षांची मुलगी आज जागतिक चर्चेचा विषय ठरली आहे. तिची बुद्धिमत्ता मोजण्यासाठी करण्यात आलेल्या चाचणीत तिचा बुद्ध्यांक म्हणजेच आयक्यू 162 इतका भरला आहे. हे प्रमाण विज्ञानातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्या बुद्ध्यांकापेक्षाही अधिक आहे. विशेष म्हणजे या दोन्ही महान शास्त्रज्ञांचा बुद्ध्यांक 160 मानला जातो. मात्र अधाराचा हा प्रवास केवळ आकडय़ांचा नसून तो संघर्षावर मिळवलेल्या विजयाचा एक प्रेरणादायी दस्तऐवज आहे. मेक्सिको सिटीच्या बाहेरील भागात अत्यंत सामान्य परिस्थितीत वाढलेल्या अधाराचा हा प्रवास प्रेरणादायी तर आहेच, पण तितकाच आव्हानात्मकसुद्धा राहिला आहे.

वयाच्या तिसऱया वर्षी अधाराला ‘ऑटिझम’ असल्याचे निदान झाले होते. लहान वयातच एका वेगळ्या मानसिक स्थितीचा सामना करत असताना तिला शाळेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तिच्या या स्थितीमुळे तिला शाळेत प्रचंड छळ सोसावा लागला आणि तिच्यावर टोमणे मारले गेले. मात्र या प्रतिकूल परिस्थितीला तिने आपले शस्त्र बनवले. ज्या वयात मुले प्राथमिक शिक्षणाची बाराखडी गिरवत असतात, त्या वयात म्हणजे अवघ्या आठव्या वर्षी अधाराने हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. एवढय़ावरच न थांबता बहुतांश मुले हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यापूर्वीच तिने अभियांत्रिकीच्या दोन पदव्या संपादन करून शैक्षणिक विश्वात खळबळ माजवून दिली.

सध्या अधारा गणितामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. मात्र तिचे पाय जमिनीवर असले तरी तिची नजर अंतराळातील स्वप्नांकडे आहे. नासामध्ये अंतराळवीर होण्याचे आणि मंगळ ग्रहावर पाऊल ठेवण्याचे तिचे अंतिम ध्येय आहे. ती केवळ गणित किंवा विज्ञानातील तज्ञ नाही, तर ती आज जगभरातील अशा मुलांसाठी एक आदर्श बनली आहे ज्यांना समाजाने ‘वेगळे’ मानले आहे. अधाराने हे सिद्ध केले आहे की, न्यूरोडायव्हर्जंट असणे किंवा इतरांपेक्षा वेगळे असणे हा कोणताही दोष नसून ती एक महाशक्ती आहे.

मेक्सिको सिटीच्या वर्गांमधून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता केप कॅनव्हरलच्या प्रक्षेपण केंद्रांच्या दिशेने वेगाने सरकत आहे. तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल जग आज चर्चा करत असताना अधारा प्रत्यक्षात ते भविष्य घडवण्याचे काम करत आहे. तिने जगातील तमाम मुलांसाठी दिलेला संदेश अत्यंत स्पष्ट आणि प्रभावी आहेः तुमचे स्वप्न तुमच्यापासून कितीही मैल दूर असले तरीही त्याचा पाठलाग करणे कधीही सोडू नका. विज्ञानाप्रति तिची ही ओढ आणि मंगळावर जाण्याचे तिचे स्वप्न येणाऱया काळात नक्कीच सत्यात उतरेल, असा विश्वास जगभरातील शिक्षणतज्ञ व्यक्त करत आहेत. तिची ही कथा केवळ कौतुकास्पद नसून प्रतिकूलतेतून यशाचे शिखर कसे गाठावे याचा वस्तुपाठच आहे.