
सामना प्रतिनिधी । वडवणी
वडवणी तालुक्यात अतिशय कमी पाऊस पडला असुन दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी आपल्यामधील उत्साह हा शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी व महाराष्ट्रात भगवा फडकवण्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा रविवारी परभणी वरुण बीड जिल्ह्यातील वडवणीत दाखल झाली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वडवणीत आगमन होताच शेतकऱ्यांसह युवा सैनिंकामध्ये अभुतपूर्व उत्साह संचारला. मोठमोठ्या जयघोषात आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी समोर असलेल्या शेतकरी, शिवसैनिकांशी सवांद साधताना म्हणाले की, ‘मी काही निवडणुकीसाठी आलो नाही पण तरीही तुमचा एवढा जबरदस्त उत्साह पाहुन भगव्या महाराष्ट्रासाठी प्रेरणा मिळाली आहे. शेतकऱ्याचा विम्याचा प्रश्न, चारा टंचाई, पाण्यासाठी टाक्या वाटप विशेषतः म्हणजे संपुर्ण कर्ज मुक्ती यासाठी आपण वेळोवेळी लढत राहु. आता तर तुमच्या उत्साहाने महाराष्ट्र भगवामय करुन दाखवणार’
यावेळी संपर्कप्रमुख आनंद जाधव, रोहयो मंत्री जयदत्त क्षिरसागर, शिवसेना नेते नेते चंद्रकांत खैरे, सचिन अहिर, आमदार राहुल पाटील, बंडू ओक,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक , कुंडलिक खाडे, उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे, बाळासाहेब अंबुरे,सह धारुर,अंबेजोगाई, केज सह वडवणीतील शिवसेना पदाधिकार्यासह शेतकरी, युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































