आदित्य संवाद… आदित्य इम्पॅक्ट!

123

सामना ऑनलाईन, नगर

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ नगरमध्ये पोहोचली. येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राधाबाई काळे महिला महाविद्यालयातील कचरा प्रश्नाबाबत एका विद्यार्थिनीने थेट प्रश्न विचारला. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी त्या प्रश्नाचे केवळ तोंडी उत्तर दिले नाही, तर कार्यक्रम संपल्यावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांना घेऊन थेट महाविद्यालय गाठले. यानंतर अवघ्या 20 मिनिटांत साफसफाईला सुरुवात झाली अन् 20 मिनिटांत कचऱ्याचा ढीग हटलासुद्धा! हा होता आदित्य संवाद आणि आदित्य इम्पॅक्ट!!

आदित्य ठाकरे राज्यातील तरुणाईशी थेट संवाद साधतात. शैक्षणिक समस्येपासून सामाजिक प्रश्नांपर्यंत मनमोकळी चर्चा करतात, तरुणाईचे समाधान करतात. जनआशीर्वाद यात्रा नगरमध्ये आली तेव्हा अशाच ‘संवाद’ कार्यक्रमात श्रद्धा तापकीर या विद्यार्थिनीने धाडसाने तिच्या काळे महाविद्यालयातील कचरा प्रश्नाकडे आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधले.

आमच्या कॉलेजच्या शेजारीच कचरा, जनावरांचे मांस टाकले जाते. त्यामुळे दुर्गंधी तर पसरली आहेच, पण आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. आता आम्ही काय करायचे, कुणाकडे दाद मागायची, असा प्रश्न श्रद्धा हिने केला. तेव्हा आदित्य यांनी तिचे कौतुक तर केलेच, पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर महाविद्यालयातच येऊन देईन असे सांगून थेट महाविद्यालय गाठले.

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी, या ठिकाणी स्वच्छता केल्यानंतर मनपाच्या जागेत उद्यान उभारून हा परिसर स्वच्छ राहण्यासाठी नियोजन करा. यापुढे कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्या, असे आदेश आयुक्तांना दिले. यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, उपनेते अनिल राठोड उपस्थित होते.

अधिकाऱ्यांना सुनावले

मनपाचे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासह अधिकारी त्यावेळी उपस्थित होते. या ठिकाणी कचरा का टाकला जातो? कचऱ्याचा उठाव का होत नाही? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला विचारले. स्वच्छता राखण्याची जबाबदारी तुमची आहे. या कचऱ्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, याचे गांभीर्य तुम्ही ठेवा, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या दणक्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत जेसीबीच्या साहाय्याने महापालिकेकडून या परिसराची साफसफाई करण्यात आली. आदित्य ठाकरे यांनी पाहणी केल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत या परिसराची स्वच्छता करण्याचे काम सुरू झाले.

आपली प्रतिक्रिया द्या