दहिसरमध्ये 5500 चौरस मीटरवर अद्ययावत क्रीडांगण, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

जॉगिंग ट्रक, ओपन जीम, फुटबॉल-क्रिकेट ग्राऊंड, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र आणि लहान मुलांसाठी खेळणी अशा अद्ययावत सुविधा असलेल्या दहिसरमधील भव्य क्रीडांगणाचे लोकार्पण आज शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तब्बल 5500 चौरस मीटरवर हे क्रीडांगण बनवण्यात आले आहे.

शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या प्रयत्नातून झालेल्या या क्रीडांगणामुळे दहिसरमधील रहिवाशांना मनोरंजन आणि खेळासाठी हक्काची जागा मिळाली असल्याचे गौरवोद्गार आदित्य ठाकरे यांनी यावेळी काढले.  याठिकाणी कबड्डीसारख्या खेळांसाठी खास ग्राऊंड तयार करण्यात आले आहे. शिवाय बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.    या क्रीडांगणाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार विलास पोतनीस, युवासेनेचे सिद्धेश कदम, नगरसेवक अमेय घोले, हर्षद कारकर, संध्या दोशी, बाळकृष्ण ब्रीद, शशिकांत झोरे, रिद्धी खुरसुंगे, सहायक आयुक्त संध्या नांदेडकर आदी उपस्थित होते.  

लवकरच सीसीटीव्ही, फ्री वायफाय

या मैदानावर येणार्‍या रहिवाशांच्या सुरक्षेसाठी लवकरच या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार असल्याचे यावेळी शीतल म्हात्रे यांनी सांगितले.  शिवाय मैदानात फ्री वायफाय सेवाही देण्यात येणार असल्याचे म्हात्रे यावेळी म्हणाल्या. या ठिकाणी 38 प्रखर प्रकाशझोताचे दिवेही लावण्यात आले आहेत.

मातीच्या ग्राऊंडचे खास आकर्षण

मुंबईत मोकळ्या जागांची कमतरता जाणवत असताना पालिकेच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या पाठपुराव्यातून क्रीडांगणे-उद्याने उभारण्यात येत असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. इतर पक्षांकडून मोकळ्या जागा बळकावण्याचा प्रयत्न होत असताना शिवसेनेचे काम निश्चितच चांगले असल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे दहिसरचे हे भव्य ग्राऊंड जास्तीत जास्त मातीच्या स्वरूपात असल्यामुळे मुलांना खर्‍या मैदानी खेळाचा आनंद लुटता येणार असल्याचेही ते म्हणाले.